लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी खुले असल्यामुळे काँग्रेसने विलासराव देशमुख यांचे कनिष्ठ पुत्र धीरज देशमुख यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून ते अध्यक्षपदाचे दावेदार असल्याची चर्चा सुरू केली. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे बंधू अरिवद पाटील यांच्या नावाची भाजपकडून चर्चा सुरू होती. मात्र आपण भाजपमध्ये पदावर आहोत तोपर्यंत आपले बंधू कोणतीही निवडणूक लढवणार नाहीत. सामान्य कार्यकर्त्यांना पदाचा सन्मान मिळावा यासाठी आपण हा निर्णय घेतला असल्याचे, पालकमंत्री निलंगेकर यांनी जाहीर केल्याने भाजपचे सामान्य कार्यकत्रे सुखावले आहेत. मात्र काँग्रेसच्या मंडळीत चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून निलंगेकरांनी कार्यकर्त्यांसाठी स्वार्थ बाजूला ठेवला तर वर्षांनुवष्रे घरात सत्तासूत्रे असलेल्या देशमुखांना मात्र सत्ता सोडवत नाही, अशी चर्चा सुरू आहे. निलंगेकरांच्या गुगलीमुळे देशमुख समर्थकांची पंचाईत झाली आहे.

आमदार, खासदारांच्या निवडणुका नेत्यांसाठी असतात. त्यामुळे सामान्य कार्यकत्रे गावोगावी त्यासाठी परिश्रम घेतात. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही कार्यकर्त्यांसाठी प्रतिष्ठेची असते. त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा जपण्यासाठी नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावावी असा संकेत आहे. या संकेताला पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी साजेशी भूमिका घेतली आहे. कासारबालकुंदा व कासारशिरसी या दोन जिल्हा परिषदेच्या गटातून बंधू अरिवद पाटील निलंगेकर यांनी निवडणूक लढवावी, असा कार्यकर्त्यांचा आग्रह असला तरी मी तुमच्या आग्रहाचा सन्मान करतो, मात्र सत्तेची पदे एकाच घरात न ठेवता ती काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी खुली केली पाहिजेत, अशी भूमिका निलंगेकर यांनी घेतली आहे. निवडणुकीत आमचे-तुमचे न पाहता ज्याची सामान्यांशी नाळ आहे व जो सामान्य माणसांच्या प्रश्नाला न्याय देईल अशाच कार्यकर्त्यांला निवडणुकीत उतरवून त्याचा सन्मान केला पाहिजे. याच भावनेपोटी आपण भावाला निवडणुकीत उभे न करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

काँग्रेस पक्षाने पक्षाची बदलती संघटनात्मक अवस्था लक्षात घेऊन व युवकांमध्ये चतन्य निर्माण व्हावे यासाठी लातूर तालुक्यातील एकुर्गा मतदारसंघातील १६ गावांच्या कार्यकर्त्यांनी एकमुखी ठराव केल्यामुळे विलासराव देशमुख यांचे कनिष्ठ चिरंजीव धीरज देशमुख यांना निवडणुकीच्या िरगणात उतरविण्याचे ठरवले आहे. लातूर, रेणापूर, औसा अशा ग्रामीण भागांत धीरज देशमुख प्रचारदौरा करीत आहेत. कार्यकत्रे त्यांच्यासोबत उत्साहात आहेत. मात्र निलंगेकरांनी टाकलेल्या गुगलीमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांत दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे. विलासराव देशमुख, दिलीपराव देशमुख, अमित देशमुख, धीरज देशमुख ही मालिका अशीच किती दिवस चालायची? पालखीचे भोई म्हणून आम्ही किती दिवस काम करायचे? असे प्रश्न कार्यकर्त्यांना सतावत आहेत.