Latur ZP Election Results 2026 : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारी रोजी मतदान पार पडले. आज (९ फेब्रुवारी) निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहे. मतमोजणीच्या प्राथामिक कलांनुसार- लातूर जिल्ह्यात काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. आर्वी गटातील जिल्हा परिषद व पंचायत समितीत काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले असून भाजपाला पराभवाचा धक्का बसला आहे. गेल्या महिन्यात झालेल्या महापालिका निवडणुकीतही लातूरमध्ये काँग्रेसला मोठे यश मिळाले होते.

लातूरमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचे एकूण १० गण आहेत. त्यातील आर्वी गटातील यंदा तिरंगी लढत पाहायला मिळाली. काँग्रेसने या जागेसाठी राजश्री देशमुख यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्याविरोधात भाजपाने वैशाली लोंढे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने वर्षा सूर्यवंशी यांना तिकीट दिले होते. मतमोजणीच्या सुरुवातीलाच काँग्रेसने आघाडी घेऊन भाजपाला पिछाडीवर सोडले. अखेर अटीतटीच्या लढतीत राजश्री देशमुख यांनी भाजपाच्या वैशाली लोंढे यांचा पराभव करून विजयाचा झेंडा फडकवला.

आणखी वाचा : “संघाचं चारित्र्य किती बिघडलेलं आहे हे सरसंघचालकांना माहिती नसेल”, संजय राऊत यांची ‘त्या’ कार्यक्रमावर टीका!

लातूर जिल्हा हा काँग्रेसचा पारंपारिक बालेकिल्ला मानला जातो. २०१२ मध्ये झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत या ठिकाणी काँग्रेसने विजय मिळवला होता. त्यानंतर २०१७ मध्ये भारतीय जनता पक्षाने ५८ पैकी ३६ जागा जिंकून लातूरमध्ये स्पष्ट बहुमत मिळवले होते. या निकालामुळे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले होते. दुसरीकडे काँग्रेसला केवळ १६ जागांवरच समाधान मानावे लागले होते, तर एकसंध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाच जागा जिंकता आल्या होत्या. याशिवाय एकसंध शिवसेनेने जिल्हा परिषदेची एक जागा आपल्या पदरात पाडून घेतली होती.

हेही वाचा : राष्ट्रवादी विलीनि‍करणाची चर्चा… जळगावमध्ये शरद पवार गटाने उचलले मोठे पाऊल !

भाजपाच्या या विजयामुळे जिल्हा परिषदेत अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदावरही आपलीच पकड मजबूत केली. मिलिंद लातुरे यांची जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने जिल्हा परिषदेत विकासकामांना गती देण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर उपाध्यक्षपदी रामचंद्र पंढरीनाथ तिरुके यांची निवड झाली होती. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या दोन्ही महत्त्वाच्या पदांवर भाजपाच्या प्रतिनिधींची निवड झाल्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनावर भाजपाचे पूर्ण नियंत्रण आले होते. यंदा मात्र लातूरमध्ये काँग्रेस मुसंडी मारणार असल्याचा दावा पक्षातील कार्यकर्त्यांनी केला आहे.