Latur ZP Election Results 2026 : राज्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत भाजपा हा क्रमांक एकच पक्ष ठरला. बहुतांश जिल्हा परिषदांवर भाजपाने स्वबळावर बहुमत मिळवले. त्यापाठोपाठ शिंदे गट व अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनेही चांगल्या जागा आपल्या पदरात पाडून घेतल्या. दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटासह काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पराभवाचा फटका बसला. यादरम्यान लातूरच्या रेणापूर तालुक्यातील कामखेडा जिल्हा परिषद निवडणुकीत दोन जावांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. कार्यकर्त्यांचा श्वास रोखून धरणाऱ्या या लढतीत अखेर काँग्रेसच्या उमेदवार आशाताई भिसे यांनी त्याच्याच जावेचा अवघ्या दोन मतांनी पराभव केला.

लातूरमध्ये कोणाची सरशी?

काँग्रेसचा पारंपारिक बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लातूरमधील जिल्हा परिषदेच्या ५९ पैकी ५२ जागांचे निकाल हाती आले. या निवडणुकीत काँग्रेसने १९ जागा जिंकल्या असून भाजपाला १७ जागांवर विजय मिळवला. त्याशिवाय दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला १० जागा मिळाल्या. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांची शिवसेना, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्ष, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेला प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत काँग्रेस हा जरी मोठा पक्ष ठरताना दिसत असला तरीही अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने भाजपा जिल्हा परिषदेची सत्ता काबीज करण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा : ठाकरेंचा उमेदवार अवघ्या एका मताने विजयी; धाराशिवमध्ये कोणाची बाजी? वाचा विजयी उमेदवारांची यादी

दोन जावांमध्ये अटीतटीची लढत

जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील कामखेडा जिल्हा परिषद गटात अटीतटीचा निकाल पाहायला मिळाला. या निवडणुकीत एकाच कुटुंबातील दोन जाऊबाई आमने-सामने आल्या होत्या. काँग्रेसच्या वतीने आशाताई भिसे यांना उमेदवारी देण्यात आली होती, तर भाजपाने सरिता भिसे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. यादरम्यान आशाताई यांनी सरिता भिसे यांचा अवघ्या दोन मतांनी पराभव केला आहे. या निकालामुळे काँग्रेस सोडून भाजपामध्ये गेलेले माजी आमदार त्र्यंबक नाना भिसे यांना स्वतःच्याच बालेकिल्ल्यात मोठा धक्का बसला आहे.

हेही वाचा : लातूरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितींवर कोणाची सत्ता? वाचा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

भाजपाचा अवघ्या दोन मतांनी पराभव

कामखेडा गटाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. कारण- भाजपाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. एका बाजूला भाजपा आणि माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यांना शह देण्यासाठी काँग्रेसने आशाताई भिसे यांनी आपल्या सामाजिक कार्याचा दांडगा अनुभव मैदानात उतरवला होता. मतमोजणीच्या शेवटच्या क्षणापर्यंत दोन्ही बाजूला श्वास रोखले गेले होते. अखेर मतमोजणीच्या शेवटच्या टप्प्यात आशाताईंनी अवघ्या दोन मतांनी विजय मिळवत भाजपाच्या उमेदवाराचा पराभव केला. हा निकाल केवळ राजकीय विजय नसून घरगुती नात्यांमधील राजकीय मतभेदांचा एक मोठा पेच ठरल्याची चर्चा रंगली आहे. त्र्यंबक नाना भिसेंच्या भाजपा प्रवेशानंतरही आशाताईंनी काँग्रेसशी राखलेली निष्ठा अखेर फळाला आली आहे.