वर्धा : साबरमती आश्रमाच्या अत्याधुनिकीकरणास विरोध दर्शविण्यासाठी सेवाग्राम ते साबरमती या संदेशयात्रेस आज आरंभ झाला. सेवाग्राम आश्रमात जेष्ठ गांधीवाद्यांच्या उपस्थितीत प्रथम सर्वधर्म प्रार्थना झाली. तसेच सभेत बोलतांना नई तालमीचे अध्यक्ष डॉ. सुगण बरंठ यांनी स्पष्ट केले की, महात्मा गांधी यांच्या राजकीय व सामाजिक आंदोलनाची प्रयोगशाळा राहलेल्या सेवाग्राम आश्रमातून आज एका नव्या आंदोलनास सुरूवात झाली आहे. कोट्यावधी रूपये खर्च करून साबरमती आश्रमाचे पर्यटन स्थळात रूपांतर करण्याची बाब अत्यंत संतापजनक आहे. महात्माजींनी बाजारकेंद्री व्यवस्थेच्या विरोधात आयुष्यभर लढा दिला. दुर्देवाने आज त्या व्यवस्थेची साबरमती आश्रमात प्रतिष्ठापणा करण्याचा घाट रचल्या जात आहे. यामूळे भावनीक व प्रेरणात्मक वातावरण नष्ट होईल. यात्रेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या अश्या प्रयत्नांबाबत सामान्याच्या अंतरात्म्याला साद घातल्या जाईल. 

देशभरातील सर्वोच्च गांधीवादी संस्था या यात्रेत सहभागी झाल्या आहे. महात्मा गांधी यांनी स्थापन केलेले आश्रम व संस्था सत्य व अहिंसेच्या प्रयोगशाळा राहील्या आहेत. जगभरासाठी ते प्रेरणास्थळ आहे. याचे भान ठेवल्या गेलेच पाहिजे, अशी भूमिका डॉ. बरंठ यांनी मांडली. 

यात्रेत सर्वोदयी कुमार प्रशांत, जलपुरूष राजेंद्र सिंह, रामचंद्र राही, संजय सिंह, डॉ. विश्वाजित राय (ओडीसा), आशा बोथरा, डॉ. शिवचरण ठाकूर, जालिंदर भाई, अशोक भारत, मालती बेन, अरविंद कुशवार, आबिदा बेगम, गोपाल सरन, भूपेश भूषण व अन्य मान्यवर सहभागी झाले आहे. जनसंवाद झाल्यानंतर यात्रा अमरावतीकडे रवाना झाली. २३ ऑक्टोंबरला यात्रा अहमदाबादला पोहोचणार असून २४ ऑक्टोंबरला साबरमती आश्रमात जनसंवाद आयोजित केलेला आहे, अशी माहिती यात्रा संयोजक संजय सिंह यांनी दिली. सेवाग्राम आश्रमचे अविनाश काकडे यांनी आजचे संयोजन केले.