लवासा प्रकल्प दिवाळखोरीच्या वाटेवर

राष्ट्रीय कंपनी कायदा लवादासमोर सुनावणी

राष्ट्रीय कंपनी कायदा लवादासमोर सुनावणी

बांधकाम उद्योगातील हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी (एचसीसी) प्रवर्तित ‘लवासा’ हा प्रतिष्ठित प्रकल्प आता दिवाळखोर ठरण्याच्या वाटेवर असून त्याबाबत राष्ट्रीय कंपनी कायदा लवादासमोर सुनावणी सुरू होत आहे.

‘लवासा’तर्फे पुण्याजवळ सर्व सुखसोयींनी युक्त असे नगर वसवले जात आहे.  लवासाला पतपुरवठा करणाऱ्या काहींनी लवासाला कर्जबाजारी ठरवण्याबाबत राष्ट्रीय कंपनी कायदा लवादासमोर याचिका केली होती. ती लवादाने दाखल करून घेतल्याचे ‘एचसीसी’ने मुंबई शेअर बाजाराला कळवले आहे.

‘लवासा’मध्ये हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीचा सर्वाधिक म्हणजे ६८.७ टक्के भांडवली वाटा आहे. त्याचबरोबर अवंता ग्रुपचा १७.१८ टक्के, वेंकटेश्वर हॅचरिजचा ७.८१ टक्के आणि विठ्ठल मणियार यांचा ६.२९ टक्के वाटा आहे.

गुंतवणूकदार हवालदिल

हा प्रकल्प दिवाळखोर म्हणून घोषित होण्याच्या वाटेवर असल्याने सामान्य गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. अनेकांनी घरांसाठी पैसे भरले होते. ते परत मिळतील, या आशेला नव्या घडामोडींनी धक्का बसल्याचे काहींनी सांगितले. लवासाने न्यायालयीन लढाईत वर्षभर वेळ काढला आणि त्यामुळे प्रकल्पात नोंदणी केलेल्या सामान्यांनाच फटका बसला, असे सूत्रांनी सांगितले. काहींनी आर्थिक गुन्हे विभागाकडेही दाद मागण्याचे ठरवले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Lavasa project is bank corrupt

ताज्या बातम्या