ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, या मागणीसाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे उपोषण केलं. लक्ष्मण हाके यांच्या मागण्यासंदर्भात सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर लक्ष्मण हाके यांनी त्यांचं उपोषण स्थगित केलं. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणासंदर्भात भाष्य केलं. तसेच मनोज जरांगे यांच्यावरही टीका केली. त्याचबरोबर ते शरद पवार यांच्यावरही बोलले. ते म्हणाले, “शरद पवार उदारमतवादी आहेत. पण शरद पवार हे आरक्षणासंदर्भात बोलत नाहीत. त्यांनी आरक्षणावर व्यक्त झालं पाहिजे”, असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं.

लक्ष्मण हाके काय म्हणाले?

“मी खूप छोटा माणूस आहे. शरद पवार म्हणजे खूप अनुभवी आणि खूप धोरणं राबवणारे आहेत. शरद पवारांनी महिलांच्या आरक्षणाबाबतचे धोरण असो किंवा मंडल आयोगाबाबतची त्यांची भावना असो. त्यांना काहीजण टार्गेट करतात. मात्र, शरद पवार प्रचंड उदारमतवादी होते, पुरोगामी होते. मी जबाबदारीने सांगतो. मी त्यांच्याबाबत नकारात्मक बोलणार नाही. पण सध्याच्या परिस्थितीत शरद पवार व्यक्त होत नाहीत. याची आम्हाला खंत आहे. शरद पवार हे प्रभावी व्यक्तिमत्व आहेत. जर त्यांनी एक बैठक बोलावली तर तरुणांना अपील करू शकतात. त्याचा सकारात्मक परिणाम महाराष्ट्रातील तरुणांवर होऊ शकतो. असं काहीतरी खुळखुळा वाजवणाऱ्या माणसामुळे आत्महत्या करणाऱ्या तरुणांना रोखले पाहिजे. समजावून सांगितलं पाहिजे”, असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं.

हेही वाचा : “झुंडशाहीच्या बळावर आरक्षणाची मागणी करणं घटनाविरोधी”, लक्ष्मण हाकेंची मनोज जरांगेंवर टीका

मराठा समाज हा शासनकर्ता समाज

हाके पुढे म्हणाले, “मराठा समाज हा शासनकर्ता समाज आहे. मग मागास्वर्गीय आयोगाने महाराष्ट्र सरकारकडे वेळोवेळी ओबीसींच्या नोकऱ्यामधील आरक्षण मागितलं होतं. आता एखाद्या समाजाला मागास्वर्गीय ठरवायचं असेल तर त्यांचं प्रतिनिधित्व तपासलं जातं. त्यामध्ये शिक्षण, नोकरी, विधासभा, लोकसभा, पंचायत राज किंवा सहकारी संस्थामधील प्रतिनिधित्व तपासलं जातं. त्यानंतर एखाद्या समाजाला मागास ठरवण्याचा अधिकार आहे. ही घटनात्मक मूल्य आहेत. ओबीसीचं नेतृत्व करणारं कोणीही संसदेत गेलं नाही, याची मला खंत वाटते. महाराष्ट्रातील कोणता खासदार ओबीसींच्या प्रश्नावर बोलणार आहे? ओबीसींची बाजू मांडणारा खासदार देशाच्या संसदेत गेला नाही, याचं मला दु:ख आहे”, असंही लक्ष्मण हाके यावेळी म्हणाले.

भुजबळांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला

दरम्यान, छगन भुजबळांच्या एका वक्तव्याबाबतही लक्ष्मण हाके यांनी भाष्य केलं. छगन भुजबळ यांनी बोलताना दिलबर के लिए दिलदार है हम, दुष्मन के लिए तलवार है हम, असं म्हटलं होतं. यावर बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले की, ‘छगन भुजबळ यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला. शायरीचा उद्देश असा असतो की, त्याचा फक्त मतितार्थ घ्यायचा असतो. पुढच्या माणसांचा विश्वास संपादन करण्यासाठी किंवा माणूस त्या माध्यमातून काहीतरी उदाहरण देत असतो. त्यामुळे छगन भुजबळ यांनी एखादे वाक्य बोलले म्हणजे उद्या ते तलवारी काढणार, असा त्याचा अर्थ काढणं चुकीचं आहे. या देशात कायद्याचं राज्य आहे. मात्र, अशा पद्धतीचा अर्थ घेऊन काही वक्तव्य करायचं हे चुकीचं आहे’, असंही लक्ष्मण हाके यांनी यावेळी स्पष्ट केलं.