Laxman Hake On Sharad Pawar : महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांवरून मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी केलेली आहे. त्यासाठी त्यांनी अनेकदा आंदोलन आणि उपोषणही केलं. मनोज जरांगे यांनी केलेल्या मागणीसंदर्भात राज्यातील सर्व राजकीय पक्षांची बैठकही काही दिवसांपूर्वी बोलावण्यात आली होती. मात्र, या बैठकीतही कोणतीही ठोस चर्चा झाली नाही किंवा काहीही तोडगा निघाला नाही. तसेच मराठा समजाच्या ओबीसीमधून आरक्षणाच्या मागणीसंदर्भात राज्य सरकारनेही अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. यातच मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीला ओबीसी समाजाने विरोध केलेला आहे. काही दिवसांपूर्वी लक्ष्मण हाके यांनी उपोषणही केलं होतं. राज्याच्या राजकारणात सध्या ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या मुद्यांवरून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यातच आज लक्ष्मण हाके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. "शरद पवार हे मनोज जरांगे यांना शांतपणे आणि पडद्यामागून पाठिंबा देत आहेत", असा आरोप लक्ष्मण हाके यांनी माध्यमांशी बोलताना केला. हेही वाचा : Supriya Sule : सुप्रिया सुळेंचं अजित पवारांबाबत मोठं विधान; म्हणाल्या, “भावाने मागितलं असतं तर पक्ष आणि चिन्ह…” लक्ष्मण हाके काय म्हणाले? "शरद पवार हे ओबीसी आरक्षणाकडे संवेदनशील भावनेने पाहत नाहीत. असा माझा त्यांच्यावर आरोप आहे. शरद पवार महाराष्ट्राचे जानते नेते आहेत. गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्यांवरून जी परिस्थिती उद्धभवली आहे. पण यामध्ये शरद पवार यांनी पद्धतशीरपणे आणि शांतपणे मनोज जरांगे यांना पडद्यामागून पाठिंबा देण्याचं काम केलं आहे", असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला आहे. प्रशांत जगताप काय म्हणाले? लक्ष्मण हाके यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी लक्ष्मण हाके यांना प्रत्युत्तर दिलं आहे. प्रशांत जगताप म्हणाले, "मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन हे उत्स्फूर्त आंदोलन आहे. त्यामध्ये मराठा समाज आरक्षणासाठी उत्स्फूर्तपणे मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर आहे. मात्र, असं असतानाही लक्ष्मण हाके हे राज्य सरकारच्या सांगण्यावरून आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या इशावरून शरद पवार यांच्यावर चुकीच्या पद्धतीने बोलत आहेत आणि टीका करत आहेत", असं प्रत्युत्तर प्रशांत जगताप यांनी लक्ष्मण हाके यांना दिलं आहे.