Laxman Hake On Devendra Fadnavis and Uddhav Thackeray : राज्याच्या राजकारणात सध्या दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू आहेत. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत अनेक नेते वेगवेगळ्या भूमिका मांडत आहेत. दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विविध मुद्यांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. असं असताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे.
‘२०२९ च्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे हे भाजपाबरोबर जातील आणि एकनाथ शिंदे हे शरद पवारांबरोबर जातील’, असं भाकित लक्ष्मण हाके यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना केलं आहे. दरम्यान, लक्ष्मण हाके यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
लक्ष्मण हाके काय म्हणाले?
“महाराष्ट्रात २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे, अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी हे पक्ष एका बाजूने असतील, तर भारतीय जनता पक्ष व उद्धव ठाकरे यांची शिवसेना हे पक्ष एका बाजूने असतील, असं चित्र २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळेल”, असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे.
“सध्या मनसेचा बेस राहिलेला नाही. राज ठाकरे यांनी अनेकवेळा भूमिका बदलल्या आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांनी अजूनही स्वत: तयारी केली पाहिजे. मात्र, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे एका बाजूला असतील आणि एकनाथ शिंदे व दोन्ही राष्ट्रवादी हे एका बाजूला असतील आणि २०२९ च्या विधानसभेच्या निवडणुका होतील”, असं वक्तव्य लक्ष्मण हाके यांनी केलं आहे.
‘२०२९ मध्ये एकनाथ शिंदे भाजपाच्या विरोधात जातील’
“आतापासूनच ध्रुवीकरणाला सुरूवात झालेली आहे. आताच्या पंचायत राज निवडणुकीत ध्रुवीकरणाला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळालं आहे. सध्या भाजपाचा विरोधक काँग्रेस नाही. दोन्ही राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना २०२९ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत भाजपाच्या विरोधात असतील”, असं मोठं वक्तव्य लक्ष्मण हाके यांनी केलं आहे.
