दाऊद इब्राहिमजवळ नेत्यांच्या बॅंक खात्यांची कुंडली

देशातील काळा पैसा हवालाच्या माध्यमातून दुबईमार्गे विदेशात पाठवण्यात येते.

मार्गदर्शन करताना सुब्रम्हण्यम स्वामी

खासदार सुब्रमण्यम स्वामी यांचा आरोप

नागपूर : देशातील काळा पैसा हवालाच्या माध्यमातून दुबईमार्गे विदेशात पाठवण्यात येते. त्याचा सूत्रधार दाऊद इब्राहिम आहे. त्याला राजकीय पुढाऱ्यांच्या खात्यांची सर्व कुंडली माहिती आहे. म्हणूनच भारतातील राजकीय पुढारी दाऊद व पाकिस्तानविषयी बोलायचे टाळतात, असा थेट आरोप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केला.

लोकतंत्र सेनानी संघातर्फे शनिवारी चिटणवीस सेंटर येथे १९७५च्या आणीबाणीचा स्मृतीदिवस सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते.  व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार ल. त्र्यं. जोशी, रवींद्र कासखेडीकर, कैलाश सोनी उपस्थित होते. स्वामी पुढे म्हणाले, आतापर्यंत अयोध्या प्रकरणात संपत्ती हाच वाद होता. त्यामुळे, हे प्रकरण निकाली लागण्यास वेळ लागत आहे. मात्र, मी स्वत: रामललाचे जन्म झाले. त्या ठिकाणी पूजन करणे हा माझा संविधानाने दिलेला मूलभूत अधिकार असल्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाला संवैधानिकरित्या मान्यच करावी लागणार असून, येत्या निवडणुकीपूर्वी अयोध्या प्रकरण निकाली निघेल. पंडित जवाहरलाल नेहरु यांनी जाणीवपूर्वक डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. राजेंद्र प्रसाद आणि सरदार वल्लभभाई पटेल यांना भारतरत्न पुरस्कार मिळू दिला नाही.

काश्मीरचा विशेष दर्जा लवकरच हटेल

राज्यघटना तयार होत असताना डॉ. आंबेडकरांचा विरोध असतानाही राज्यघटनेत काश्मीरसंदर्भात ३७० कलम तयार करण्याचे निर्देश दिले. मात्र, हा देशद्रोह असल्याचे ठरवत आंबेडकरांनी त्यास साफ विरोध दर्शवला होता. नंतर, कधीतरी राज्यघटनेत हे कलम ‘तात्पुरती तरतूद ’ म्हणून समाविष्ट करण्यात आले. हे कलम बाद करण्यासाठी कोणत्याही बहुमताची गरज नाही, असे राज्यघटनेतच नमूद करण्यात आले आहे. हा अधिकार पूर्णत: पंतप्रधानांना आहे. लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी तसा प्रस्ताव तयार करून पारित करतील,असा दावाही त्यांनी केला.

 

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Leaders bank accounts detail with dawood ibrahim says mp subramanian swamy

ताज्या बातम्या