छत्रपती संभाजीनगर – बीड जिल्ह्यात नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराला वेग आला असून, भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंगळवारी मुंबईत प्रवेश केला. धोंडे यांची ओळख भाजपचे आमदार सुरेश धस यांचे कट्टर विरोधक व मंत्री पंकजा मुंडे यांचे समर्थक म्हणूनच सर्वश्रुत आहे.
दोन्ही शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख राहिलेले कुंडलिक खांडे यांनीही मंगळवारीच पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधले. क्षीरसागर घराण्यातील तरूण नेते हेमंत क्षीरसागर हेही सत्ताधारीपैकी एका प्रमुख पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. हेमंत क्षीरसागर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार संदीप क्षीरसागर यांचे बंधू आहेत.
दोन दिवसांपूर्वी परळीचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे (अजित पवार) आमदार धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय दीपक देशमुख यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी स्वतः शरद पवार, बीडचे खासदार बजरंग सोनवणे, आमदार जितेंद्र आव्हाड, प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ फड यांची प्रमुख उपस्थिती होती.
आपले काका तथा भाजपचे राज्यातील मातब्बर नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना धनंजय मुंडे यांनी परळीत जेव्हा आव्हान दिले तेव्हा नगराध्यक्षपदासाठी दीपक देशमुख यांचे नाव पुढे केले होते. धनंजय मुंडे यांच्या या राजकीय खेळीत दीपक देशमुख हे नाव राज्याला परिचित झाले होते. त्यापासून देशमुख हे कट्टर धनंजय मुंडे समर्थक म्हणून ओळखले जात होते. परंतु अलिकडे दीपक देशमुख हे धनंजय मुंडे यांच्यापासून दुरावले होते. अखेर त्यांनी धनंजय मुंडे यांच्यापासून फारकत घेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यानंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना विधानसभा निवडणुकीत परळीमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस मतदान झाले असून, नगर परिषदेतही विकासकामे न करताच निधी हडपला जात असल्याचा आरोप करत धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले आहेत.
माजी आमदार भीमराव धोंडे हे आष्टीचे भाजपचे आमदार सुरेश धस यांचे कडवे विरोधक तर मंत्री पंकजा मुंडे यांचे समर्थक मानले जातात. धस विरुद्ध मुंडे भावंडांमध्ये चालणारे वाकयुद्ध, राजकारण पाहता धोंडे यांचा राष्ट्रवादीतील प्रवेशामागचे राजकीय अर्थ स्पष्ट आहेत. ओबीसी प्रवर्गातून येणारे धोंडे यांनी महायुतीत बंडखोरी करत विधानसभा निवडणुकीत सुरेश धस यांच्याविरुद्ध लढत देत दुसऱ्या क्रमांकावर राहून तब्बल ६५ हजार ५३५ मते घेतली होती. धोंडेंच्या मतांवरूनच धस यांनी विजय नोंदवताच पंकजा मुंडे यांच्यावर जाहीरपणे टीका केली होती. पंकजा मुंडे यांनी धोंडे यांना छुपी मदत केल्याचा आरोप धस यांनी केला होता. संतोष देशमुख हत्या प्रकरणात धस यांनी वाल्मीक कराडला “आका” आणि “आकाचे आका” असे म्हणत धनंजय मुंडे यांनाही लक्ष्य केले होते.
धोंडे यांचे चौथ्यांदा पक्षांतर
आष्टीचे माजी आमदार राहिलेले भीमराव धोंडे यांचा अपक्ष, काँग्रेस, भाजप व आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) असा राजकीय प्रवास राहिला आहे. त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर त्यांचा स्वतंत्र पक्षही काढला होता. १९९७-९८ सालच्या आसपास त्यांनी शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन बीड ते दिल्लीपर्यंत काढलेली पदयात्रा चांगलीच गाजली होती. १९८० साली धोंडे अपक्ष निवडून आले. त्यानंतर सलग दोनवेळा काँग्रेसकडून तर २०१४ मध्ये ते भाजपकडून निवडून आले होते.
अलिकडेच दिवाळीनंतर माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी परळीमध्ये मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. बदामराव पंडित हे गेवराईचे आमदार राहिलेले आहेत. त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केला.
