कराड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील ४६ प्रसूतिगृहांना गळती लागली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील कोरबू यांनी पंचायत समितीच्या सभेत दिली. सभेत वीज कंपनी, एसटी महामंडाळाच्या कारभारावर सदस्यांनी नाराजी व्यक्त करत ताशेरे ओढले. अध्यक्षस्थानी सभापती देवराज पाटील होते.
भाग्यश्री पाटील यांनी तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असणारी ४६ प्रसूतिगृह गळत असल्याचा मुद्दा मांडला. यावर डॉ. सुनील कोरबू यांना वेळोवेळी प्रस्ताव देऊनही निधी मिळत नसल्याचे सांगितले. परंतु, तात्पुरती डिलीव्हरी रूमची सोय करण्यात आल्याचे ते म्हणाले. यावेळी बालविकास, एकात्मिक प्रकल्प, पशुसंवर्धन, जीवन प्राधिकरण, बांधकाम आदी विभागांचा आढावा घेण्यात आला.
अडीच वष्रे मागणी करूनही आटके परिसरात सिंगल फेज योजना कार्यान्वित केली  जात नाही. अधिकारी बदलल्याने काम रेंगाळले आहे. शासनाची कृषी संजीवनी योजना शेतीसाठी आहे. मात्र, नळपाणी पुरवठा योजनेसाठी ही योजना कार्यान्वित करण्याचा ठराव सभेत करण्यात आला. कृषी विभागाचा आढावा घेताना राष्ट्रीय फलोत्पादन योजनेंतर्गत नव्याने कार्यान्वित होणाऱ्या यांत्रिकीकरण हे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या कृषी विभागामार्फत देण्याचा ठराव करण्यात आला. पंचायत समितीचा यांत्रिकीकरण विभाग बंद पडू नये यासाठी पंचायत समितीने ठराव करावा अशी सूचना मांडण्यात आली.
टेंभू योजनेतून दुष्काळी भागाला पाणी देत असताना हजारमाची, राजमाची, बाबरमाची येथील शेतकऱ्यांच्या जमिनीमधून पाईपलाईन केली आहे. हे काम करत असताना स्थानिक शेतकरी व ग्रामपंचायतींना विश्वासात घेतलेले नाही. ठेकेदार व संबंधित विभागाने हजारमाची तलावात पाणी सोडण्याचे तोंडी आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते. त्याची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी करण्यात आली. यावर्षी कृषी विभागामार्फत हेळगाव मधील शेतकऱ्यांना मिळालेले बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार करण्यात आली. यावर कृषी अधिकारी शिवप्रसाद मांगले यांनी हेळगावच्या लोकांनी शेणोली येथून बियाणे आणले होते. याबाबत कृषी विभागास काहीही माहिती नव्हती. या बियाणांची कसल्याही प्रकारची उगवण झालेली नाही. याबाबत संबंधित शेतकऱ्यांशी संपर्क साधून ग्राहकमंचातर्फे तक्रार करण्यात येणार असल्याचे सांगितले. एसटी महामंडळाकडून अनेक ठिकाणी एसटीची सुविधा आहे. मात्र, एसटीतील वाहकाची वागणूक व्यवस्थित नाही. काही वाहक दारू पिऊन एसटी चालवत असल्याची तक्रार सवादेच्या सदस्या राजश्री थोरात यांनी केली. याबाबत आपल्यालाच अनुभव आल्याचा त्या म्हणाल्या. यावर सर्व महिला सदस्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. सदस्या थोरात यांनी वाहक व चालक यांना ग्राहकांशी कसे वागावे याबाबत प्रशिक्षण देण्यात यावे अशी मागणी केली.
एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी वाहकांकडून होत असलेला गैरप्रकार आढळल्यास तत्काळ एसटी महामंडळाकडे माहिती कळवावी अशी विनंती केली. तालुक्यातील प्राथमिक अरोग्य केंद्रांतर्गत ओंड येथे असलेले उपकेंद्र सध्या येवतीला जोडण्यात आले आहे. ते काले प्राथमिक आरोग्य केंद्राला जोडल्यास ओंड येथील नागरिकांची आरोग्य सेवेची सोय होईल असा मुद्दा धोंडीराम जाधव यांनी मांडला. त्यावर तालुका वैद्यकीय अधिकारी सुनील कोरबू यांनी सध्या काले उपकेंद्रांतर्गत मलकापूर केंद्र जोडलेले आहे. ते वगळल्यास काले केंद्रावरील भार कमी होऊन ओंडमधील नागरिकांची सोय होईल असे सांगितले.