scorecardresearch

Premium

शिवसेनेचा बालेकिल्ला भेदण्याचे भाजपपुढे आव्हान

 गेल्या चार निवडणुकांमध्ये युती विरूद्ध आघाडी अशा लढतील शिवसेनेने सहज बाजी मारली, यावेळेस राज्यातील बदलेल्या समीकरणानुसार महाविकास आघाडी विरूद्ध भाजप असा सामना रंगणार आहे.

शिवसेनेचा बालेकिल्ला भेदण्याचे भाजपपुढे आव्हान

|| प्रबोध देशपांडे

विधान परिषद निवडणूक- अकोला-बुलढाणा-वाशीम मतदारसंघ

asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…
virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
ajit pawar
‘दादा कचऱ्याची गाडी येत नाही’, भरकार्यक्रमात महिलेची तक्रार, अजित पवारांनी दिलं मिश्किल उत्तर, म्हणाले…

अकोला : विधान परिषदेच्या अकोला, वाशीम व बुलढाणा स्थानिक  प्राधिकारी संस्था मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला असून यावेळेस त्याला भेदण्याचे मोठे आव्हान भाजपपुढे राहणार आहे. ‘मविआ’कडून शिवसेनेचे विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया पुन्हा रिंगणात उतरतील, हे जवळपास निश्चिात असून भाजपने उमेदवारी संदर्भात अद्याप आपले पत्ते उघडले नाहीत. चार ते पाच नावे चर्चेत आहेत. भाजपच्या उमेदवाराची उत्सुकता लागली आहे.

 गेल्या चार निवडणुकांमध्ये युती विरूद्ध आघाडी अशा लढतील शिवसेनेने सहज बाजी मारली, यावेळेस राज्यातील बदलेल्या समीकरणानुसार महाविकास आघाडी विरूद्ध भाजप असा सामना रंगणार आहे.

या मतदारसंघात विजयाची ‘हॅट्ट्रिक’करणारे शिवसेनेचे विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी निवडणुकीच्या दृष्टीने गत सहा महिन्यांपासून तयारी सुरू केली. इतर काही इच्छुकांची मोर्चेबांधणी केली आहे. अकोला, वाशीम व बुलढाणा जिल्ह्यांतील जिल्हा परिषद सदस्य, महानगरपालिका सदस्य, नगरपालिका, नगरपंचायत सदस्य आणि पंचायत समिती सभापती यांना मतदानाचा हक्क आहे. निवडणुकीसाठी तिन्ही जिल्ह्यांत ८१७ मतदार आहेत.

महाविकास आघाडीकडे संख्याबळ

विजयासाठी आवश्यक असलेल्या संख्येपेक्षा अधिक मतदार महाविकास आघाडीकडे आहेत. युतीविरुद्ध आघाडीच्या लढतीत शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया यांनी राष्ट्रवादीचे रवी सपकाळ यांच्यावर मात केली होती. बाजोरियांना ५१३ तर सपकाळ यांना २३९ मते मिळाली होती. गेल्या चार निवडणुकांमध्ये शिवसेनेने या मतदारसंघात विजय संपादन के ला आहे. यामध्ये राजेंद्र पाटणी एक वेळा, तर तिनदा बाजोरिया विजयी झाले. विजयासाठी युतीकडे अपुरे मतदार असतांना गोपीकिशन बाजोरिया यांनी ‘किमया’ घडवत चमत्कारीत विजय मिळवले आहेत. अकोल्याचा बाजोरिया पॅटर्न त्यांनी हिंगोली-परभणी मतदारसंघात रुजवत पुत्र विप्लव यांनाही परिषदेवर निवडून आणले.  या निवडणुकीत ‘अर्थ’कारण व घोडेबाजार जोरदार चालतो, हे उघड गुपित आहे.

शिवसेनेने आतापर्यंत जिंकलेल्या चार निवडणुकीत भाजपची त्यांना साथ मिळाली. भाजपचे गठ्ठा मतदान शिवसेनेकडे वळत होते. काँग्रेस व राष्ट्रवादीने एकत्रित लढा देत विजयासाठी आवश्यक मतदार संख्या असतांनाही आतापर्यंत त्यांना या मतदारसंघात झेंडा रोवता आला नाही. दरवेळेस आघाडीचे मतदार फुटून ते बाजोरियांना पडले. मतदारांना आपल्या बाजूने वळवण्याचे कौशल्य बाजोरियांना अवगत असल्याचे आतापर्यंत झालेल्या निवडणुकीवरून स्पष्ट होते. भाजपने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. मात्र, निवडणुकीच्या दृष्टीने त्यांनी तयारी केली. भाजपकडून अकोल्यातील विजय अग्रवाल, वसंत खंडेलवाल, बुलढाणा जिल्ह्यातील माजी आमदार चैनसुख संचेती, डॉ. योगेंद्र गोडे, वाशीम जिल्ह्यातील विजय जाधव आदींची नावे चर्चेत आहेत.

‘वंचित’चे वजन कुणाच्या पारड्यात?

विधान परिषद निवडणूक लढण्यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीने अद्याप कुठला निर्णय घेतलेला नाही. वंचितचे ६०-७० मतदार आहेत. ते निर्णायक भूमिका बजावू शकतात. गेल्या निवडणुकीत सद्विवेकबुद्धीने निर्णय घेण्याचे आदेश वंचितच्या मतदारांना होते. आता वंचित नेमकी काय भूमिका घेते? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

विधान परिषद निवडणूक लढण्याची भाजपची संपूर्ण तयारी झाली आहे. लवकरच सक्षम उमेदवार जाहीर करण्यात येईल. भाजप पूर्ण ताकदीने निवडणूक लढणार आहे.   – आ. डॉ. संजय कुटे, प्रदेश उपाध्यक्ष, भाजप.

स्थानिक स्वराज्य संस्था व पदवीधर विधान परिषदेची निवडणूक लढण्याची वंचित बहुजन आघाडीची चाचपणी सुरू आहे. अनेक इच्छुक संपर्कात आहेत. अंतिम निर्णय राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर घेतील. – डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, प्रदेश उपाध्यक्ष, वंचित आघाडी.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Legislative council election akola buldhana washim constituency akp

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×