रत्नागिरी : कोंबड्यांच्या खोलीत बिबट्या शिरल्याची कोणतीही चाहूल नसताना घरातील सदस्यांनी दरवाजा बंद केला आणि बिबट्या रात्रभर त्याच खोलीत बंदिस्त राहिला! रात्रभर कोंबड्यांचा फडशा पाडल्यानंतर दुसऱ्या दिवशी दरवाजा उघडताच बिबट्याने थेट महिलेवर झेप घेत हल्ला केल्याची थरारक घटना संगमेश्वर तालुक्यातील कोंडये सुवरेवाडी येथे मंगळवारी घडली.

या हल्ल्यात मीना धोंडू सुवरे यांच्या चेहऱ्याला बिबट्याचे नख लागल्याने त्या जखमी झाल्या. सुदैवाने बिबट्याने जंगलाच्या दिशेने धूम ठोकल्याने त्यांचा जीव वाचला. घराच्या अगदी शेजारीच घडलेल्या या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

कोंडये सुवरेवाडी येथील मीना सुवरे यांच्या घराशेजारी कोंबड्यांसाठी चिरेबंदी खोली बांधण्यात आली आहे. नेहमीप्रमाणे संध्याकाळी अंधार पडल्यानंतर कोंबड्या या खोलीत जातात. त्यानंतर घरातील सदस्य खोलीचा दरवाजा बंद करतात. घटनेच्या दिवशीही नेहमीप्रमाणे हीच प्रक्रिया पार पडली. मात्र, दरवाजा बंद करण्यापूर्वी बिबट्या कोणत्या तरी मार्गाने खोलीत शिरला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. बिबट्या आत असल्याची कोणालाही कल्पना नसल्याने खोलीचा दरवाजा बंद करण्यात आला आणि हा हिंस्र वन्यप्राणी रात्रभर आतच अडकून पडला.

खोलीत बंदिस्त झालेल्या बिबट्याने रात्रभरात तेथील सर्व कोंबड्यांवर हल्ला करून त्यांना ठार केले. मात्र, खोलीत बिबट्या असल्याचा संशय घरातील कोणालाही आला नाही. दुसऱ्या दिवशी दुपारी मीना सुवरे कोंबड्यांना बाहेर सोडण्यासाठी आणि नेहमीची कामे करण्यासाठी खोलीचा दरवाजा उघडायला गेल्या. दरवाजा उघडल्यानंतर कोंबड्या बाहेर येतील, अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र, दरवाजा उघडताच समोर बिबट्या दिसल्याने त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

खोलीतून बाहेर पडण्यासाठी बिबट्याने क्षणाचाही विलंब न करता थेट दरवाजाच्या दिशेने झेप घेतली. याचवेळी त्याचा पंजा आणि नख मीना सुवरे यांच्या चेहऱ्याला लागल्याने त्या जखमी झाल्या. अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे त्यांची घाबरगुंडी उडाली. काही क्षणांतच घडलेल्या या थरारक घटनेत बिबट्याने पुन्हा हल्ला केला नाही. तो तेथून थेट जंगलाच्या दिशेने पळून गेल्याने मोठी दुर्घटना टळली.

घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी जखमी मीना धोंडू सुवरे यांना तातडीने फुणगूस प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी त्यांच्या चेहऱ्यावरील जखमेवर उपचार करून आवश्यक प्राथमिक वैद्यकीय मदत दिली. दरम्यान, या घटनेची माहिती पसरताच सुवरेवाडीतील ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली. घराशेजारील कोंबड्यांच्या खोलीत बिबट्या रात्रभर लपून राहिल्याच्या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

परिसरातील जनावरांचे गोठे, कोंबड्यांच्या खोल्या आणि आडोशाच्या जागांमध्ये वन्यप्राण्यांचा वावर वाढत असल्याने शेतकरी, महिला आणि ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. घराच्या इतक्या जवळ बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

भविष्यात अशा घटना घडून जीवितहानी होऊ नये, यासाठी वनविभागाने परिसरात तातडीने पिंजरा लावावा, नियमित गस्त वाढवावी आणि बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सुवरेवाडीतील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.