सांगली : खंबाळे-भाळवणीतील एका शेतात बिबट्याचा मृतदेह आढळून आला असून त्याचा मृत्यू आजाराने झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाल्याचे वन परिक्षेत्र अधिकारी व्ही. एन. पवळे यांनी शनिवारी सांगितले.
भाळवणी येथील शेतकरी संभाजी धनवडे हे विहीरीवर पंप सुरू करण्यासाठी शुक्रवारी गेले होते. विहीरीजवळ बिबट्या पडलेला दिसला. याची त्यांनी तात्काळ माहिती गावकर्यांना दिली. गावकर्यांनी दूरूनच बिबट्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याची काहीच हालचाल दिसली नाही. यामुळे जवळ जाउन पाहिले असता तो मृतावस्थेत असल्याचे आढळले. याची माहिती वन विभागाला मिळताच वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेउन त्याचे शवविच्छेदन केले.
तपासणीनंतर त्याचा मृत्यू आजारपणामुळे झाला असल्याचा अहवाल पशूवैद्यक तज्ञांनी वन विभागाला दिला आहे. मृत बिबट्या नर जातीचा व अडीच ते तीन वर्षे वयाचा होता.