राहाता : तालुक्यातील कोल्हार बुद्रुक परिसरात अवघ्या सहा दिवसांपूर्वी येथे या एकाच परिसरात जेरबंद झालेला पाचवा बिबट्या पिंजरा तोडून पळाल्याची घटना ताजी असतानाच आठवडाभराच्या आत शुक्रवारी रात्री सहावा बिबट्या त्याच ठिकाणी पिंजऱ्यात अडकला. निव्वळ दीड महिन्याच्या कालावधीत एकाच शिवारात सहा बिबटे जेरबंद झाले आहेत.
पकडलेला पाचवा बिबट्या पिंजरा तोडून पळाल्यानंतर कोल्हार बुद्रुक येथे नवाळे – निबे वस्तीजवळ कोळपकर यांच्या चिकूच्या बागेत पुन्हा पिंजरा ठेवण्यात आला. शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सहावा बिबट्या जेरबंद झाला. डरकाळ्यांचा मोठा आवाज ऐकून आजूबाजूच्या रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली. पुन्हा बिबट्या पळून जाण्याची घटना घडू नये म्हणून तत्काळ वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. रात्रीतूनच पिंजऱ्यातील बिबट्या घेऊन जाण्याची विनंती करण्यात आली. बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी जमली. एकाच कोल्हार बुद्रुकच्या या एकाच परिसरात दीड महिन्याच्या कालावधीत एकापाठोपाठ सहा बिबटे पकडले जाण्याची घटना घडली. शिवाय अलीकडच्या काही दिवसांपूर्वी राजुरी रोडलगतच्या कापसे वस्तीवर दोन बिबट्यांच्या झुंजीत एक बिबट्या गतप्राण झाल्याची घटना घडली. यावरून कोल्हार परिसरातील बिबट्यांचा धुमाकूळ सर्वत्र चर्चेचा आणि भीतीचा विषय झाला आहे.
बिबट्याच्या वाढत्या संचारामुळे या भागातील रहिवासी आणि शेतकरी धास्तावले आहेत. रात्रीचे घराबाहेर पडण्याबरोबरच शेतामध्ये काम करणे आता भीतिदायक बनले आहे. बिबट्याची दहशत या भागात प्रत्यक्ष अनुभवायला मिळत आहे. नेमक्या एकाच भागात एकापाठोपाठ एवढे बिबटे पकडले जात असल्याने सर्वत्र भीती व्यक्त केली जात आहे. तसेच बिबट्या पकडण्याबद्दल संशयही व्यक्त होत आहे.