सातारा : अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या शाहूनगरमध्ये रात्री एका बंगल्याच्या आवारात बिबट्याने घुसून कुत्र्यावर हल्ला केला. या हल्ल्यात कुत्रा जखमी झाला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या परिसरात बिबट्याचा वावर नित्याचा झाला आहे. आता तो थेट मानवी वस्तीत शिरल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे व भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
शहरातील चार भिंतीकडून पेरेंट स्कूलकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या या सोसायटीत ही घटना घडली. पावसामुळे काही भटकी कुत्री बंगल्याच्या आवारात होती. रात्री साडेअकरा वाजता अजिंक्यतारा किल्ल्याच्या बाजूने आलेल्या बिबट्याने संरक्षक भिंतीवरून उडी मारून एका कुत्र्यावर हल्ला केला. अजिंक्यतारा किल्ल्यावर घनदाट जंगल आहे. अन्नाच्या शोधात बिबट्यासारखे हिंस्र प्राणी आता थेट शहराच्या वस्तीत घुसत आहेत. नागरिकांना वारंवार बिबट्या दिसूनही वनविभाग कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. विभागाने पिंजरा लावला होता, मात्र बिबट्याने त्याला हूल दिल्यानंतर तो पिंजरा काढून घेण्यात आला. तेव्हापासून वनविभागाने या समस्येकडे पूर्णपणे पाठ फिरवल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वनविभागाने या समस्येचे गांभीर्य ओळखून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी नागरिकांनी मागणी केली आहे.
अजिंक्यतारा किल्ल्याच्या परिसरात झाडी आहे. तसेच किल्ल्याच्या पायथ्याला मोठी लोकवस्ती आहे. अन्नाच्या शोधात सतत बिबट्या या परिसरात येत असतो. तेथे काही दिवसांपूर्वी मादी बिबट्या आणि पिल्ले दिसून आली होती. या परिसरामध्ये बिबट्याचे वास्तव्य असल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने तत्काळ कारवाई करावी.- महेश कानेटकर, शाहूनगर, सातारा</p>