राजापूर : राजापूर तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असतानाच जुवाठी शिर्केवाडी येथे एका विहिरीत बिबट्या पडल्याची घटना उघडकीस आली. मात्र वनविभागाच्या तत्परतेमुळे अवघ्या चार-पाच मिनिटांत या बिबट्याची सुखरूप सुटका करण्यात यश आले.
रामचंद्र नारायण भारती यांच्या मालकीच्या सुमारे ३५ ते ४० फूट खोल विहिरीत हा बिबट्या पडला होता. ही माहिती मिळताच वनविभागाची रेस्क्यू टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. बिबट्या विहिरीतील दगडावर बसून असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पिंजऱ्याच्या सहाय्याने त्याला बाहेर काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली.
दोरीच्या साहाय्याने विहिरीत सोडलेल्या पिंजऱ्यात घाबरलेला बिबट्या काही मिनिटांत शिरला आणि वनविभागाने अत्यंत कौशल्याने त्याला बाहेर काढले. सुमारे दीड ते दोन वर्षे वयाच्या मादी बिबट्याची पशुवैद्यकीय तपासणी केल्यानंतर तो पूर्णपणे सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले.
या मोहिमेत विभागीय वनअधिकारी गिरिजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक प्रियांका लगड, वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल जयराम बावदाणे, वनरक्षक विक्रम कुंभार तसेच रेस्क्यू टीममधील कर्मचाऱ्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने ही कारवाई यशस्वी केली. तपासणीनंतर संबंधित बिबट्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आल्याची माहिती वनविभागाने दिली.
