सांगली : शिराळा तालुक्यातील बिऊर येथील अंगणात खेळत असलेल्या मुलांवर झडप घालून ठार करणारा  बिबट्या अखेर मंगळवारी रात्री जेरबंद करण्यात बचाव पथकाला यश आले. मृत पावलेल्या बालकाच्या कुटूंबाला वन विभागाने २५ लाखांची मदत देण्यात आली.

‘ शिराळा तालुक्यातील बिऊर येथे दि. ३० जानेवारी रोजी सायंकाळी अंगणात खेळत असलेल्या एका लहान बालकावर बिबट्याने हल्ला करून एक किलोमीटर जबड्यात धरुन फरफटत नेले. लोकांचा गलका, आरडाओरडा यामुळे बालकाला सोडून पळ काढला होता. या हल्ल्यात राजवीर पाटील या चार वर्षांच्या बालकाचा बळी गेला होता.

या बालकावर हल्ला करणाऱ्या  बिबट्या अखेर जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले. हा बिबट्या जेरबंद  करून आता सांगली मधील उपवनसंरक्षक कार्यालयात आणण्यात आला असून त्याला  पुण्याला पाठवले जाणार आहे.

पुणे येथील बचाव पथकाने तसेच श्वानपथक, थर्मल कॅमेरे यांचा वापर करून या  परिसरातच सापळे लावण्यात आले होते.  रात्री बारा वाजण्याच्या दरम्यान वन विभागाला हा बिबट्या पकडण्यास यश आले. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

 राजवीर पाटील या चार वर्षे बालकावर मागील ३० तारखेला शुक्रवारी सायंकाळी घरासमोर बिबट्याने हल्ला केला होता. राजवीर व त्याची बहीण घरासमोरील अंगणात एकत्र खेळत होते. त्यावेळी बिबट्याने तिच्या बहिणीसमोर राजवीर वर झडप टाकून त्याला सुमारे एक किलोमीटर अंतरापर्यंत फरफटत नेले. त्यावेळी लहान मुलीने आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील लोक जमा झाले आणि बिबट्याच्या दिशेने पळत गेले त्यावेळी बिबट्याने राजवीरचा मृतदेह त्या ठिकाणी टाकून तो शिवारात पळून गेला, यातच राजवीर चा जागीच मृत्यू झाला. यापासून या परिसरातील नागरिक चिंतेत भीतीच्या वातावरणात होते.

शिराळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार सत्यजित देशमुख यांनी या प्रश्नी लक्ष घालून वन विभागाशी संपर्क साधून सतत पाठपुरावा करत बिबट्या पकडण्यासाठी प्रयत्न केले आहे.  तसेच या परिसरातील नागरिकांच्या भावना तीव्र झाल्या होत्या. वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये आक्रमक व संतापाची लाट उसळली होती. ज्या दिवशी राजवीर वर हल्ला झाला होता त्या दिवशी या परिसरातील नागरिकांनी घटनेच्या रागापोटी वनविभागाच्या कार्यालयावर हल्ला करून तोडफोड केली होती..