पूरग्रस्त कोकणात आता लेप्टोस्पायरोसिसचा धोका; महाडमध्ये सापडले २९ रुग्ण!

पुराचा तडाखा बसल्यानंतर आता कोकणामध्ये लेप्टो स्पायरोसिस आणि इतर साथीच्या आजारांचा धोका वाढला आहे.

leptospirosis
पूरग्रस्त कोकणात लेप्टोस्पायरोसिसचा धोका

संदीप आचार्य, लोकसत्ता
सांगली, कोल्हापूरपासून कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथील पूरग्रस्त भागात साथीचे आजार तसेच करोना वाढू नये यासाठी आरोग्य विभागाचे डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत असले तरी पूरग्रस्त कोकणात लेप्टोस्पायरोसिसचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळण्याची भीती आरोग्य विभागाच्या डॉक्टरांकडून व्यक्त करण्यात येत आहे. एकट्या महाड तालुक्यात लेप्टोस्पायरोसिसचे ५९ संशयित रुग्ण आढळून आले होते. एलायझा चाचणीत त्यापैकी २९ जणांना लेप्टोस्पायरोसिस झाल्याचे स्पष्ट झाले आहे. एकट्या महाड तालुक्यात आजपर्यंत एवढ्या मोठ्या संख्येने कधीच लेप्टोस्पायरोसिसचे रुग्ण आढळले नव्हते असे सांगून पुरामुळे कोकणात यंदा मोठ्या प्रमाणात लेप्टोस्पायरोसिसचे रुग्ण आढळतील असे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

कोकण किनारपट्टी भागात लेप्टोचे रुग्ण

प्रामुख्याने मुंबई बरोबर कोकणातील किनारपट्टी भागातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर पट्ट्यात लेप्टोस्पायरोसिसचे रुग्ण आढळून येतात. कुत्रा, डुक्कर, उंदीर आदी प्राण्यांचे मूत्र रस्त्यावर साठलेल्या पाण्यात मिसळून त्यातून लेप्टोस्पायरोसिस हा आजार होतो. कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या पूरग्रस्त भागात लेप्टोस्पायरोसिससह साथीच्या आजारांचा धोका ओळखून व्यापक प्रमाणात सर्वेक्षण व चाचण्या करण्यात येत असून अतिजोखमीचे काम करणाऱ्यांना लेप्टोस्पायरोसिस होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक म्हणून डॉक्सीसाक्लीनच्या गोळ्या देण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

२९ रुग्णांना लेप्टोची बाधा झाल्याचं स्पष्ट

राज्यातील पूरग्रस्त भागात करोनाचे सक्रिय रुग्ण वाढू नये यासाठी विशेष काळजी घेतानाच साथरोग फैलावू नये यासाठी सर्वेक्षण, चाचणी व उपचार हे युद्धपातळीवर सुरु असल्याचे डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. रायगडमध्ये जवळपास लेप्टोस्पायरोसिसचे ५९ संशयित रुग्ण आढळून आले. या रुग्णांची एलायझा चाचणी केल्यानंतर त्यातील २९ रुग्णांना लेप्टो झाल्याचे स्पष्ट झाले. अलिबाग जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांनी या सर्व रुग्णांचे अहवाल व उपचाराची माहिती आरोग्य संचालकांना पाठवली आहे. वैद्यकीय पथकांना व्यापक सर्वेक्षण करण्यास सांगण्यात आले असून लेप्टोस्पायरोसिस होण्याची शक्यता असलेल्या भागात पुरेसे चाचणी किट व डॉक्सीसाक्लीनच्या गोळ्यांचा साठा ठेवण्यात आल्याचे राज्याचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले.

रुग्ण वाढण्याची भिती!

भातशेतीचे काम करणारे तसेच जनावरे राखणारे आणि आता पूरग्रस्त भागात सर्वत्र आरोग्य विभागाला सतर्क राहून काम करावे लागत असल्याचे डॉ. प्रदीप आवटे म्हणाले. २०१९मध्ये राज्यात लेप्टोस्पायरोसिसचे ६८४ रुग्ण आढळून आले तर १५ जणांचे मृत्यू झाले. यात मुंबईत २७९ रुग्ण आढळले तर ११ मृत्यू झाले. सिंधुदुर्गमध्ये ३५६ रुग्ण आढळले होते. ठाणे व पुणे येथे अनुक्रमे १५ व १७ रुग्ण आढळले. २०२० मध्ये राज्यात आढळलेल्या २०४ रुग्णांमध्ये मुंबईत १९४ आढळले. सिंधुदुर्ग मध्ये ९ तर रत्नागिरीत १ रुग्ण आढळला होता. २०२१ मध्ये ३ ऑगस्टपर्यंत १५० लेप्टोस्पायरोसिसचे रुग्ण आढळले तर दोन जागांचे मृत्यू झाले. यात रायगडमध्ये २९ रुग्ण, सिंधुदुर्गमध्ये ३१, मुंबईत ८८ आणि ठाणे मनपात दोन रुग्ण तर दोघांचे मृत्यू झाले. मागील दोन तीन वर्षांची आकडेवारी आणि पूरानंतर बदलेली परिस्थिती लक्षात घेता लेप्टोस्पायरोसिसचे रुग्ण वाढण्याची भीती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Leptospirosis patients found in flood affected konkan region in maharashtra pmw

Next Story
‘कोरा कागद निळी शाई, आम्ही कोणाला भीत नाही’!
ताज्या बातम्या