संदीप आचार्य

करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात ठेवायचा असेल तर मास्क घालणे, सोशल डिस्टसिंग व स्वच्छता या त्रिसुत्रीबरोबर करोना रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना शोधून तपासणी करणे याला आरोग्य तज्ज्ञांनी सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. परंतु महाराष्ट्रातील तब्बल ३१ जिल्ह्यांमध्ये याबाबत कमालीची ढिलाई दिसून आली आहे. नियमानुसार एका करोना रुग्णामागे संपर्कातील २० लोक शोधले पाहिजे असे निश्चित असताना ३१ जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण १० पेक्षा कमी आढळून आले आहे.

एकीकडे सरकार मॉलपासून प्रवासा पर्यंत वेगवेगळ्या गोष्टी खुल्या करत आहे. तर दुसरीकडे मंदिरंही उघडण्याची मागणी करत ‘भाजप’ घंटानाद करत आहे. या सार्वात महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात करोना रुग्ण वाढत असून राज्यातील रुग्णसंख्या साडेआठ लाख झाल्याचे व २५ हजाराहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याकडे दुर्लक्ष होत आहे. राज्यात आजच्या दिवशी दोन लाखांहून अधिक रुग्ण करोनावरील उपचारासाठी रुग्णालयात दाखल असून जागोजागी सोशल डिस्टंसिंगचे बारा वाजले आहेत. तर मास्क घालणाऱ्यांचे प्रमाणही कमी होताना दिसत आहे. हे कमी ठरावे म्हणून राज्यातील जिल्हाधिकारी व महापालिका स्तरावर आयुक्त करोना रुग्णांच्या संपर्कातील लोक शोधण्याच्या कामी ढिली पडल्याचे आकडेवारीवरूनच दिसून येते.

एकामागे २० रुग्ण शोधणं आवश्यक

‘आयसीएमआर’ नियमानुसार एका करोना रुग्णामागे २० संपर्कातील लोकांना शोधणे आवश्यक आहे. यात हाय रिस्क असलेले १२ व लो रिस्क असलेले ८ असे प्रमाण निश्चित करण्यात आले आहे. राज्यातील ३१ जिल्ह्यांमध्ये रुग्ण संपर्कातील लोक शोधण्याचे प्रमाण हे १० पेक्षा कमी असल्याचा अहवाल आहे. यात हाय रिस्क रुग्ण संपर्कातील लोक शोधण्याचे प्रमाण हे ८.२ तर लो रिस्क संपर्कातील लोक शोधण्याचे प्रमाण हे
१२.९ एवढे आहे. राज्यातील अहमदनगर, अकोला, अमरावती, बुलढाणा, जालना, नांदेड, उस्मानाबाद, पालघर, रायगड, सांगली, सातारा व यवतमाळ जिल्हात हाय रिस्क गटातील रुग्ण संपर्क तपासाचे प्रमाण हे साधारणपणे एका रुग्णामागे ६ ते ७.८ रुग्ण शोधण्याचे आहे. यात आरोग्यमंत्र्यांच्या जालना जिल्ह्यात रुग्णाच्या संपर्कातील लोक शोधण्याचे प्रमाण हे ७. ६ एवढेच आहे. याशिवाय कोल्हापूर जिल्ह्यात हाय रिस्क रुग्ण संपर्कातील लोकांना शोधण्याचे प्रमाण हे केवळ ५.६ एवढे आहे तर लो रिस्क रुग्ण संपर्कातील लोक शोधण्याचे प्रमाण हे अवघा १.६ एवढेच आहे. सोलापूर मध्ये ५.६, सातारा ६.१ , पुणे ५.८,परभणीत ५.८ एवढेच रुग्ण संपर्कातील लोक शोधण्यात आले आहेत.

घंटानाद व मंदिर उघडण्याची मागणी करून राजकारण करणारी मंडळी रुग्णांच्या संपर्कातील लोकं शोधण्यासाठी तसेच सोशल डिस्टसिंग व लोकांनी मास्क लावावा ही मोहीम का हाती घेत नाहीत?, असा सवालही आरोग्य विभागाच्या काही डॉक्टरांनी केला.