महाराष्ट्रात लहान वयातील आरोपींचे गुन्हा सिध्द होण्याचे प्रमाण १० टक्क्याखाली असून ते वाढायलाच हवे. सोबत नागरिकांमध्ये कायद्याचा धाक निर्माण होण्याकरिता प्रत्येक गंभीर गुन्ह्य़ातील बाल गुन्हेगारालाही कडक शिक्षा होण्याची गरज आहे. त्याकरिता राज्य व केंद्र सरकारने प्रसंगी कायद्यात आवश्यक बदल करून नवीन कायदा करण्याची गरज आहे. शिवसेना याकरिता आग्रही आहे, असे मत शिवसेनेच्या नेत्या व विधान परिषदेच्या विशेष हक्क समितीच्या प्रमुख डॉ. निलम गोऱ्हे यांनी विधानभवन परिसरात व्यक्त केले.
त्या म्हणाल्या की, निर्भयासह यासारख्या इतरही गंभीर प्रकरणातील बाल गुन्हेगारांना कडक शिक्षा होण्याची गरज आहे, परंतु त्याकरिता आवश्यक असलेला बालगुन्हेगारीशी संबंधित कायदा राज्यसभेत बऱ्याच महिन्यांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे आजही महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागात बरेच आरोपी वयाचा फायदा घेऊन सुटत असल्याचे धक्कादायक चित्र आहे. निर्भया प्रकरणातही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा प्रत्येकाला आदर करण्याची गरज आहे, परंतु या प्रकरणात न्यायालयाने केंद्र सरकारला काही मार्गदर्शक सूचना करण्याकरिता पुढाकार घेण्याची गरज होती. त्यामुळे असल्या आरोपींना कडक शिक्षा होण्याचा मार्ग लवकरच सुकर झाला असता.
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. हा विषय राज्यसभेत संजय राऊत व अनिल देसाई शिवसेनाच्या वतीने उपस्थित करणार असल्याचे गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.