scorecardresearch

जिल्हा अजूनही तहानलेला!

राज्यातील इतर भागांत समाधानकारक पाऊस सुरू असला तरी नगर जिल्हा अद्यापि तहानलेलाच आहे. जिल्हय़ातील ९७ महसूल मंडळापैकी जवळपास निम्म्या, म्हणजे ४८ मंडळात अजूनही ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेला आहे.

राज्यातील इतर भागांत समाधानकारक पाऊस सुरू असला तरी नगर जिल्हा अद्यापि तहानलेलाच आहे. जिल्हय़ातील ९७ महसूल मंडळापैकी जवळपास निम्म्या, म्हणजे ४८ मंडळात अजूनही ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेला आहे. जिल्हय़ातील सव्वासहा लाख लोकसंख्येला ३५५ टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा लागत आहे. झालेल्या पावसावर कापूस व बाजरीच्या पेरणीला शेतकऱ्यांनी पुन्हा सुरुवात केली आहे.
खरिपाच्या सुमारे ३० टक्के पेरण्या झाल्याची माहिती कृषी विभागाकडून उपलब्ध झाली. पावसाअभावी पेरणी खोळंबली होती, असे शेतकरी आता बाजरीच्या पिकाकडे वळले आहेत, त्यामुळे बाजरीसह कापूस, मका क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्हय़ात आतापर्यंत सरासरीच्या २१.४१ टक्के पाऊस झाला आहे.
राज्यात इतरत्र पावसाने धुमाकूळ घातला आहे, मात्र जिल्हा पावसासाठी आसुसलेलाच आहे. पाऊस केव्हाही कोसळेल असे वातावरण रोजच असते, मात्र अकोले तालुका वगळता दिवसभरात किरकोळ रिमझिम स्वरूपाशिवाय पाऊस होत नाही. अकोल्यात जोरदार पावसाने भातलागणीचे काम जोरात सुरू आहे.
दहा दिवसांपूर्वी जिल्हय़ात ३७० टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा लागत होता. किरकोळ पावसाने गेल्या दहा दिवसांत केवळ १५ टँकरची कमी झाले. एकूण २८७ गावे व १ हजार ३१८ वाडय़ांना ३५५ टँकरने पुरवठा होत आहे. सर्वाधिक टँकर पाथर्डीत (७३) सुरू आहेत. तालुकानिहाय संख्या अशी : संगमनेर- ४४, अकोले- ८, कोपरगाव- ९, श्रीरामपूर- १, राहुरी- २, नेवासे- ४, राहाता- १३, नगर- ४४, पारनेर- ५७, शेवगाव- २५, कर्जत- ४५, जामखेड- २२, श्रीगोंदे- ८.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Less than 50 rain in nagar district

ताज्या बातम्या