राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक ड्रग्ज प्रकरणांची चर्चा सुरू आहे. अशातच आता NCB च्या प्रमुखांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात राज्यातली महत्त्वाची पाच ड्रग्ज प्रकरणं एनसीबीकडे वर्ग करण्याचे गृहमंत्री अमित शाह यांचे आदेश असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

गृहमंत्री अमित शाह यांनी आदेश दिल्यानंतर एनसीबीच्या प्रमुखांकडून हे पत्र पाठवण्यात आलं आहे. या पत्रामुळे पुन्हा एकदा केंद्र – राज्य संघर्षाची चिन्हं दिसू लागली आहेत. या पत्रामुळे आता कोणती हायप्रोफाइल आणि महत्त्वाची प्रकरणं केंद्राच्या ताब्यात जातील, याकडे लक्ष लागून राहणार आहे.

दरम्यान, आर्यन खान ड्रग्ज प्रकरणापासून सातत्याने NCB वर टीका करणारे राज्याचे अल्पसंख्याक मंत्री तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी अमित शाहांच्या या आदेशावरही टीका केली आहे. या प्रकरणावर बोलताना नवाब मलिकांनी काही प्रश्न विचारले आहेत. या पत्रामध्ये NCB ने उल्लेख केला होता की, अमित शाह यांच्या आदेशानुसार राज्याच्या अँटी नार्कोटिक्स सेलने ज्या ५ महत्त्वाच्या टॉप केसेस केलेल्या आहेत. त्या एनसीबीला तात्काळ हस्तांतरीत करण्यात याव्यात.

एनसीबीच्या महासंचालकांच्या पत्राच्या अनुषंगाने अमित शाह यांना सवाल विचारताना मलिक म्हणाले, ‘त्यांनी एनसीबीला दिलेल्या आदेशात ज्या पाच केसेस नमूद केल्या आहेत. त्या केसेसचे निकष काय आहेत? एनसीबीने कारवाई केलेल्या छोट्या केसेस की राज्याच्या युनिटने हस्तगत केलेल्या ३ टन ड्रग्जसारख्या मोठ्या केसेस आहेत, हे असं बोलत मलिकांनी एनसीबीसह केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. एनसीबीपेक्षा अधिक काम राज्याच्या अँन्टी नार्कोटिक्स विभागाने केलं आहे. संबंधित पाच केसेसच्या माध्यमातून NCBचा पैसे उकळण्याचा धंदा सुरु आहे, असाही आरोप मलिकांनी केला आहे.