सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज जेन झींशी संवाद साधला. या मुलाखतीत त्यांनी दिल्लीत झालेलं आंदोलन, जेन झींची विचार करण्याची पद्धत, सोशल मीडिया अशा प्रकाराच्या विविध प्रश्नांची उत्तरं दिली. मोहन भागवत यांना या मुलाखतीत LGBTQ समाज आणि समलिंगी विवाह यांच्याबाबत प्रश्न विचारला गेला. त्यावर त्यांनी LGBTQ हे समाजाचाच भाग आहेत असं म्हटलं आहे.

समलिंगी विवाह आणि LGBTQ यांच्याबाबत काय म्हणाले मोहन भागवत?

LGBTQ हे आपल्या समाजाचा भाग आहेत त्यांनाही समान अधिकार आहेत ही भूमिका तुम्ही खूपवेळा मांडली आहे, पण समलिंगी विवाह भारतात अजून कायदेशीर नाही. याबाबत संघाची जी विचारधारा आहे त्यबाबत जेन झी आणि जेन अल्फाही चर्चा करतात. समलिंगी विवाहांना संघाचा विरोध का आहे? असा प्रश्न मोहन भागवत यांना विचारण्यात आला. त्यावेळी मोहन भागवत म्हणाले, “LGBTQ किंवा तुम्ही काहीही नाव द्या, ते आपल्याच समाजाचा भाग आहेत. आपण ज्या समाजातून येतो त्याच समाजातून ते येतात. आपल्या समाजात विवाह अशासाठी केला जात नाही की दोन व्यक्तींना बरोबर राहता यावं. विवाहातून कुटुंब व्यवस्था उभी राहते अशी व्यवस्था आहे. त्यामुळे आपण समाजात त्याला विवाह संस्था असं म्हणतो. विवाहातून तयार झालेली कुटुंबं हा आपल्या समाजाचा महत्त्वाचा भाग आहेत. कुटुंबांकडून पुढच्या पिढ्यांना एक चांगले नागरिक व्हा हे शिकवलं जातं. याचा पहिला भाग सुरु होतो तो आई-वडील यांच्यापासून. सध्या अशीच व्यवस्था आपल्या समाजात पूर्वापार चालत आली आहे.” असं मोहन भागवत म्हणाले.

समलिंगींचं सहजीवन कसं सोपं करण्यासाठी समाजाचं प्रबोधन आवश्यक-मोहन भागवत

मोहन भागवत पुढे म्हणाले की, आता आपल्याला बदल स्वीकारायचे असतील तर एक काहीतरी सिस्टिम किंवा ज्याला व्यवस्था म्हटलं जातं ती आधी असणं अपेक्षित आहे. जर आहे त्या विवाह व्यवस्थेला आपण धक्का लावणार असू आणि नवी व्यवस्था आपल्याकडे नसेल तर त्यामुळे साहजिकच वाद आणि वादंग निर्माण होतील. दुसरी महत्त्वाची बाब अशी की आपण या दोन्ही बाबी म्हणजेच समलिंगी विवाह आणि आत्ताची जी विवाह व्यवस्था आहे ती एकत्र करु शकत नाही. आधी आपल्याला समाजाची तशी तयारी करुन घ्यावी लागेल. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे कायदे हे समाज घडवत नसतात, समाज कायदे घडवत असतो. आधी समाजाचं प्रबोधन करावं लागेल. जर सध्याच्या विवाह संस्थेला आपण धक्का लावला तर गुंतागुंत किंवा तिढाच वाढेल. त्याच्या परिणामांना सामोरे जायला आपण तयार असू का? त्यामुळे मला असं वाटतं की समलिंगी विवाह नव्हे पण ते एकत्र कसे राहू शकतील, त्यांच्या सहजीवनासाठी काय गरजेचं आहे? हे बघावं लागेल. त्यासाठी यंत्रणा उभी करावी लागेल, कायदे करावी लागतील समाज त्याबाबत सकारात्मक विचार करेल. त्यामुळे भविष्यातही समाज सुरळीत चालेल असं मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.