सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर पोलीस मदत केंद्राअंतर्गत कोपेला येथे पोलीस दलातील जवानाची हत्या करणारा नक्षलवादी प्लाटून दलमचा कमांडर डुंगा ऊर्फ येशु ऊर्फ वसंतराव बापु टेकाम (३४) याला गडचिरोली जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप व ६ हजार रु. दंडाची शिक्षा सुनावली.

पोलीस दलात कार्यरत  नागेश पापया पायाम हे २८ सप्टेंबर २००९ रोजी दसरा साजरा करण्यासाठी आपल्या मूळ गावी मौजा कोपेला येथे आले होते. यावेळी नक्षलवाद्यांनी बंदुकीची गोळी झाडून त्यांचा व त्यांची लहान बहीण सुनीताचा खून केला होता. याप्रकरणी गडचिरोली पोलीस दलाने  नक्षलवाद्यांच्या प्लॉटून १५ चा कमांडर डुंगा ऊर्फ येशू ऊर्फ वसंतराव बापू टेकाम (३४) कापेचंचा ता. अहेरी जि. गडचिरोली यास अटक केली. पोलीस उपनिरीक्षक मंगेश नंदकुमार जगताप यांनी तपास करून आरोपीविरुद्ध  जिल्हा व सत्र न्यायालय गडचिरोली येथे दोषारोपपत्र दाखल केले होते.  न्यायालयाने फिर्यादी व साक्षीदारांचे बयाण नोंदवून  आरोपीस जन्मठेप व ५ हजार रु. दंड १४८, भादंविमध्ये ३ वर्षे १००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता एन. एम. भांडेकर यांनी बाजू मांडली. कोर्ट पैरवी म्हणून पोलीस उपनिरीक्षक नारायण बच्चलवार यांनी काम पाहिले.