मारहाण केल्याच्या खटल्यात विरोधात साक्ष देण्याच्या कारणावरून नेत्र साक्षीदाराचा खून केल्याबद्दल मोहोळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा एक पदाधिकारी व त्याच्या भावासह आठ जणांना सोलापूरचे जिल्हा व सत्र न्यायाधीश अश्विनीकुमार देवरे यांनी जन्मठेप व दंडाची शिक्षा ठोठावली.
मोहोळ तालुक्यातील नरखेड येथे घडलेल्या या खूनखटल्यात प्रमोद ऊर्फ पापा पांडुरंग गरड (४०) व त्याचा भाऊ भाऊसाहेब पांडुरंग गरड (३५) तसेच संभाजी लक्ष्मण गरड (२८), बळीराम कृष्णात घोटणे (४२), त्याचा भाऊ अशोक कृष्णात घोटणे (३७), रमेश सुखदेव गरड (२८), सुनील विष्णू खंदारे (२५) व हणमंत भागवत गरड (२१, सर्व रा. नरखेड) अशी जन्मठेप व प्रत्येकी १० हजारांचा दंड ठोठावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या सर्वावर धन्यकुमार ऊर्फ समाधान सुदाम उबाळे (३५) याचा खून केल्याचा आरोप होता.
या खटल्यातील मुख्य आरोपी प्रमोद ऊर्फ पापा गरड हा राष्ट्रवादी काँग्रेसचा मोहोळ तालुका शाखेचा पदाधिकारी आहे. तो व इतरांनी २०१० साली नरखेड गावात एसटी बसस्थानकावर हणमंत खंदारे व विठ्ठल खंदारे या दोघा तरुणांना बेदम मारहाण केली होती. याप्रकरणी गरड व इतरांविरुद्ध मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. हा  खटला मोहोळ न्यायालयात न्यायप्रविष्ट होता. या खटल्यात धन्यकुमार उबाळे हा नेत्र साक्षीदार होता म्हणून पापा गरड व त्याचे साथीदार उबाळे यास न्यायालयात आमच्या विरुद्ध साक्ष देऊ न देण्यासाठी दबाव आणत होते. परंतु त्यास उबाळे हा बळी पडत नव्हता. आपण धमकी दिली तरी उबाळे हा ऐकत नाही म्हणून गरड हा त्याच्यावर चिडून होता.
दरम्यान, १९ जुलै २०१२ रोजी धन्यकुमार उबाळे हा पाहुण्याच्या घरी वर्षश्राद्ध आटोपून मोटारसायकलवरून परत निघाला असताना गावातच श्रद्धाराणी कलेक्शन साडी सेंटर या दुकानासमोर पापा गरड व त्याच्या साथीदारांनी उबाळे यास अडवले व मोटारसायकलवरून खाली ओढले. ‘आमच्या विरोधात साक्ष देऊ नकोस म्हणून सांगूनदेखील तू ऐकत नाहीस काय?’ असे म्हणून त्याच्यावर तलवार, कोयता व सत्तूरने सपासप वार केले. यात त्याच्या मानेवर, खांद्यावर, तोंडावर,  हातांवर तीक्ष्ण वार झाले. मोठय़ा प्रमाणात रक्तस्राव होऊन उबाळे हा जागीच मृत्युमुखी पडला होता. हल्ल्यानंतर आरोपी पापा गरड व त्याचे सर्व साथीदार पळून गेले. मृत उबाळे याचा भाऊ सुभाष उबाळे हा तेथे धावून आला असता तेथून आरोपी पळून जाताना त्याने पाहिले होते. हा प्रकार प्रबोधन रमेश साठे यानेही पाहिला होता. मोहोळ पोलीस ठाण्यात सुभाष उबाळे याने आरोपी पापा गरड व इतरांविरुद्ध फिर्याद नोंदवली. पोलीस तपास अधिकारी एस. आर. धुमाळ यांनी तपास पूर्ण करून आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
या खटल्यात सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील प्रवीण शेंडे यांनी १० साक्षीदार तपासले. यात प्रत्यक्ष नेत्र साक्षीदार फिर्यादी सुभाष उबाळे व दुसरा नेत्र साक्षीदार प्रबोधन साठे तसेच नीलकंठ पुंडलिक खंदारे यांच्यासह पोलीस तपास अधिकारी धुमाळ, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रल्हाद गायकवाड यांची साक्ष महत्त्वाची ठरली. मूळ फिर्यादीतर्फे अ‍ॅड. विक्रांत फताटे यांनी काम पाहिले. तर आरोपींतर्फे अ‍ॅड. मिलिंद थोबडे, अ‍ॅड. धनंजय माने व अ‍ॅड. भारत कट्टे यांनी बचाव केला.