विकेंड प्लॅन करण्याआधी सावधान; राज्याच्या ‘या’ भागांना हवामान विभागाने दिला गारपिटीसह पावसाचा इशारा

येत्या विकेंडला कोकणासह मध्य महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता आहे तर गारपीट होण्याचीही शक्यता आहे.

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत हवामान कोरडं होतं. तर खान्देश आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका कायम आहे. पण यानंतर आता राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसात राज्याच्या काही भागांत हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

२२ आणि २३ जानेवारी रोजी कोकणासह मध्य महाराष्ट्रात आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता विकेंड प्लॅन करताना खबरदारी घेण्याची गरज आहे. हवामान खात्याने शनिवारी २२ जानेवारी रोजी मुंबईसह पुणे, ठाणे, पालघर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर, रायगड आणि रत्नागिरी या अकरा जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. याठिकाणी ढगाळ हवामान राहण्याची शक्यता असून विकेंडला हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळणार आहेत.

तर २३ जानेवारी रोजी हवामान खात्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. या दोन जिल्ह्यात रविवारी तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर पुढील काही दिवस खान्देश, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात दाट धुक्यासह गारठा कायम राहणार आहे. त्यानंतर २१ आणि २२ जानेवारी रोजी संबंधित विभागात तुरळक ठिकाणी हलक्या ते मुसळधार पावसासह गारपीट होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, २१ ते २३ जानेवारी दरम्यान पश्चिम हिमालय परिसरात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. दरम्यान तुरळक ठिकाणी हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे. तर २२ जानेवारी रोजी हिमाचल प्रदेशात पावसासह बर्फवृष्टी होणार आहे. तर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये पुढील तीन दिवस दाट धुके पडणार आहे. त्यामुळे रात्री आणि पहाटे प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होऊ शकतो.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Light to moderate rainfall in konkan and central maharastra vsk

Next Story
“राष्ट्रवादी सगळ्यात हुशार पक्ष, मुख्यमंत्रीपद शिवसेनेला देऊन फाईली..”; निवडणूक निकालानंतर चंद्रकांत पाटलांचा प्रतिक्रिया
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी