जिल्ह्यातील काही भागात शनिवारी दुपारी पावसाने हजेरी लावली. नांदगाव तालुक्यातील वेहळगाव येथे वीज पडून युवकाचा मृत्यू झाला. दुसरीकडे त्र्यंबकेश्वर तालुक्यात रिमझिम सुरू असल्याने सिंहस्थ कामे पूर्ण करताना प्रशासनाच्या नाकीनऊ येणार आहेत.
नांदगाव, त्र्यंबकेश्वर तालुक्यात दुपारी पावसाने हजेरी लावली. नांदगाव तालुक्यात त्याचा जोर चांगला होता. यावेळी बकरी चारण्यासाठी गेलेल्या सुनील हरिदास माळी (१७) याचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. जूनच्या सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. बी-बियाणे, खत खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रात त्यांची गर्दी दिसत आहे. शनिवारी दुपारी दीड ते दोन तास हिसवळ बुद्रुक ते न्यायडोंगरी तसेच बाणगाव, वेहळगाव आदी भागाला पावसाने झोडपले. परिसरातील नाले दुथडी भरून वाहू लागल्याचे पाहावयास मिळाले. त्र्यंबकेश्वर परिसरात पावसाची रिपरिप सुरू आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यास सुरुवात होण्यास अवघ्या काही दिवसांचा कालावधी राहिला आहे. सिंहस्थाची अनेक कामे सध्या प्रगतिपथावर आहेत. पावसामुळे विहित मुदतीत ही कामे पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.