नागपूर: इराण आणि अमेरिकेमध्ये अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम विविध उद्योगांवर होत आहे. सुरुवातीला सिलिंडरचा साठा मर्यादित झाल्याने अनेक खानावली आणि हॉटेल व्यवसायिक अडचणीत आले. त्यानंतर पेट्रोलचा साठाही कमी झाल्याच्या बातम्या आल्याने रोज पेट्रोल पंपावर रांगा दिसतात. त्यानंतर आता मद्य उद्योगावर संकट निर्माण झाले आहे. काचेच्या बॉटल्स येणे बंद झाल्याने मद्य निर्मिती करण्यात अडचणी येत आहेत. आता पंधराच दिवसांचा साठा शिल्लक असल्याची माहिती आहे. त्यामुळे तळीरामांवर संकट ओढवण्याची शक्यता आहे.

भीती का निर्माण झाली

बिअर, सलाईन तसेच विविध क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या काचेच्या बाटल्या तयार करणाऱ्या ‘कॅनपॅक’ कंपनीस ‘ एलपीजी ’ गॅस न मिळाल्यास सुरक्षेचे प्रश्न निर्माण होतील. या कंपनीमध्ये काच गरम करण्यासाठी लागणारी उष्णता बंद करण्याची प्रक्रिया बटन दाबल्यासारखी केली जाऊ शकत नाही तसे केल्यास सुमारे ६०० कोटीचे नुकसान होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. राज्यात अनेक जिल्ह्यात मद्य निर्मितीचे कारखाने असून मद्य व बिअरच्या बाटल्या भरण्यास अडचणी निर्माण होतील अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. परिणामी राज्याच्या महसूलातही मोठी घट होऊ शकते.

असे आहे संकट

काचेच्या बाटल्या तयार करण्यासाठी तापमान १७०० अंशापर्यंत वाढवत न्यावे लागते. त्यामुळे तापमान कमी करण्याचा कालावधी एक महिना लागतो. पुढे तेवढी तापमान वाढ करण्याचा कालावधी सहा महिन्याचा असू शकतो. या कंपनीमध्ये एक हजार कामगार काम करतात. कंपनी बंद पडली तर त्यांच्यासमोर नवे प्रश्न निर्माण होतील. तापमान वाढविण्यासाठी दररोज या कंपनीस १२ मेट्रीक टन ‘ एलपीजी ’ गॅसची आवश्यकता आहे. तापमान कमी करण्याचे काही प्रयोग हाती घेण्यात आले आहेत. मात्र, हाताशी केवळ चार दिवस एवढाच गॅस पुरवठा आहे.

मुख्यमंत्र्यांनाही निवेदन

जरी बाटल्यांचे उत्पादन काढले नाही तरी उष्णता निर्माण करणारी भट्टी सतत चालू ठेवणे अनिवार्य असते. बटन दाबले की ती यंत्रणा बंद करणे धोक्याचे असते. त्यामुळे काच व्यावसायातील अडचणी वाढतील असे सांगण्यात येत आहे. केवळ काचच नाही तर अल्युमिनियमपासुन साठवणुकीचे पात्र अर्थात कॅन बनविण्यासाठीही ही प्रक्रिया असते. या कॅन बनविण्याच्या कंपनीमध्ये २०० कामगार काम करतात. अचानक गॅस पुरवठा थांबला तर सुरक्षाविषयक अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात, असे सांगत पेट्रोलियम कंपन्या आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहेत. अपुऱ्या गॅस पुरवठ्यामुळे अनेक कंपन्या बंद पडू लागल्या आहेत.