सांगली : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन औदुंबर (ता. पलूस) येथे घेण्याबाबत साहित्य महामंडळाच्या पथकाने शुक्रवारी पाहणी केली. ग्रामीण भागात साहित्याचा प्रसार वाढविण्यासाठी औदुंबरची जागा साहित्य संमेलनासाठी निश्चित करावी, अशी मागणी यावेळी सदानंद साहित्य मंडळाचे कार्यवाह पुरुषोत्तम जोशी यांनी पथकाकडे केली.

औदुंबर येथे ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात यावे, अशी मागणी औदुंबरच्या सदानंद साहित्य मंडळाने केली आहे. या मागणीनुसार महामंडळाच्या पथकाने शुक्रवारी स्थळ पाहणी केली. पथकामध्ये अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरैया स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी आदी होते. पथकाने यावेळी औदुंबर व अंकलखोपमधील ग्रामस्थांशीही चर्चा केली. कवी सुधांशु यांच्या निवासस्थानास पथकाने भेट दिली. यावेळी सदानंद साहित्य मंडळाच्या कार्याचा आढावा घेणारी ध्वनिचित्रफीतही पथकाच्या सदस्यांना दाखवण्यात आली.

पाहणीनंतर अध्यक्ष प्रा.जोशी यांनी सांगितले, आम्ही फक्त संमेलनाचे स्थळ निश्चित करण्यासाठी जागा पाहण्याचे काम करून हा अहवाल अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या कार्यालयात मांडणार आहे. त्यानंतर मंडळाची बैठक होऊन साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी भरवायचे यावर शिक्कमोर्तब होईल. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजनाबाबत ग्रामीण साहित्य रसिकांमध्ये उत्साह असल्याचे कार्यवाह श्रीमती पवार म्हणाल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याप्रसंगी श्री दत्त देवस्थानचे अध्यक्ष संतोष पाटील, मंडळाचे अध्यक्ष शहाजी सूर्यवंशी, प्रा. सुभाष कवडे, हणमंत पाटील, उमेश जोशी, प्रा.प्रदीप पाटील, प्रा. संतोष काळे आदी उपस्थित होते.