आरोग्य शास्त्राच्या दृष्टिने मानवी मल-मूत्र विसर्जन प्रक्रिया किती महत्वाची आहे हे सर्वजण जाणून असताना महाराष्ट्राच्या राजकारणातही या प्रक्रियेस आलेले महत्व मात्र महाराष्ट्रीयन संस्कृतीचे आरोग्य बिघडविण्यास कारणीभूत ठरणारे आहे. दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रातील इंदापूर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या या प्रक्रियेचा उल्लेख आणि या प्रक्रियेवर खास आपल्या ‘ष्टाईल’ने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेला ‘प्रक्रिया उद्योग’, तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काही वर्षांपूर्वी मालेगावकरांना दिलेल्या जिल्हा निर्मितीचे वचन पूर्ण करण्याची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेली ग्वाही, यामुळे हा आठवडा उत्तर महाराष्ट्रासाठी ठाकरे बंधुंचा ठरला.
केवळ एक दिवसाआड उध्दव आणि राज यांच्या उत्तर महाराष्ट्रात जाहीर सभा झाल्या. त्यापैकी उध्दव यांची नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे शनिवारी तर राज यांची जळगाव येथे रविवारी. राज यांची जळगावला पहिलीच तर उध्दव यांची मालेगावला दुसरी जाहीर सभा. उध्दव यांच्या सभेला कारण ठरले ते जलसंधारणाच्या कामांच्या भूमिपूजनाचे तर, राज यांच्या सभेसाठी राज्यव्यापी विभागवार सभांच्या समारोपाचे. दोघांच्या सभेला तुडुंब गर्दी. उध्दव आणि राज यांच्या या दौऱ्यांनी उत्तर महाराष्ट्राला काय दिले याचा विचार करता आश्वासनांव्यतिरिक्त काहीही नाही हे मांडावे लागेल. अर्थात सध्या दोघेही विरोधी पक्षात असल्याने देण्यासारखे त्यांच्याकडे तेवढेच आहे. दोघांच्या भाषणांमध्ये केवळ एक-दोन विषयांचा अपवाद वगळता त्याच त्या मुद्यांचा समावेश. उध्दव यांनी आपल्या जाहीर सभेत युती सत्तेवर आल्यास मालेगाव जिल्हा निर्मिती होणारच, हा एक वेगळा मुद्दा मांडला. मालेगाव तालुक्यात कुठेही कोणत्याही राज्यस्तरीय नेत्याची सभा असेल तर मालेगाव जिल्हा निर्मितीविषयी त्याला बोलावेच लागते हा जणूकाही अलिखीत नियमच होऊन गेला आहे. बॅरिस्टर अ. रा. अंतुले यांनी सर्वप्रथम दिलेल्या आश्वासनापासून मालेगाव जिल्हा निर्मितीचे जे तुणतुणे वाजविले जात आहे, त्याचा सूर काही केल्या थांबण्यास तयार नाही. या सूरात त्यानंतरच्या प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी सूर मिसळविला. १९९७ मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही युती सत्तेवर आल्यास मालेगाव जिल्हा निर्मिती करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. हे आश्वासन पूर्ण न झाल्याने आता उध्दव ठाकरे यांनी वडिलांचे आश्वासन पूर्ण करण्याची ग्वाही मालेगावकरांना दिली आहे. याव्यतिरिक्त उध्दव यांनी मालेगाव तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीवर कायमचा उपाय म्हणून जलसंधारणाचा मुद्दा मांडला. नाशिकपेक्षा मालेगावमध्ये शिवसेनेची ताकद अजूनही कायम आहे, याचे समाधान समोरची गर्दी पाहून उध्दव यांना नक्कीच झाले असेल.
उध्दव यांची सभा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी जळगाव येथे राज यांची सभा झाली. आतापर्यंतच्या प्रत्येक विभागवार सभेत त्या ठिकाणच्या स्थानिक वजनदार नेत्यांवर थेट टीकास्त्र सोडत टाळ्या वसूल करण्याची राज यांची खुबी जळगावमध्ये मात्र पाहावयास मिळाली नाही. सद्या शिवसेनेत असलेले आ. सुरेश जैन आणि विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे हे दोन नेते राज यांच्या ‘रडार’वर असतील असे मानण्यात येत होते. परंतु विधीमंडळ अधिवेशन सुरू होण्याआधी खडसे यांच्यावर ‘सेटलमेंट’ चा आरोप करणाऱ्या राज यांनी त्यानंतर मात्र खडसेंविरोधात जाहीर टीका करण्याचे टाळले. याउलट भाजपशी असलेले मैत्रीचे नाते टिकविण्यासाठी राज यांच्याकडून प्रयत्न होत असल्याचे मनसेच्या ताब्यात असलेल्या एकमेव नाशिक महापालिकेतही त्यानंतर राज यांच्या दौऱ्यात दिसून आले. त्यामुळेच केव्हां कोणावर टीका करावी, ही हुषारी दाखविणाऱ्या राज यांनी जळगावमध्ये खडसेंविरोधात ब्र देखील काढला नाही. हा त्यांचा मुत्सद्दीपणा म्हणावा की ‘राजकीय सेटलमेंट’ याचे कोडे स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांनाही पडले आहे. जळगावचे अनभिषिक्त सम्राट म्हणून ओळखले जाणारे सुरेश जैन घरकुल घोटाळ्यात वर्षभरापासून न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यामुळे निदान जैन यांच्यावर तरी ठाकरी फटकारे पडतील, अशी अपेक्षा सर्वाना होती. परंतु केवळ काही वर्षांपूर्वीचे एक उदाहरण देत आणि जैन यांची नक्कल करीत राज यांनी तो विषयही फारसा ताणला नाही. त्यामुळेच तोच मराठीचा, तोच परप्रांतियाचा, तोच बेरोजगारीचा मुद्दा मांडणाऱ्या राज यांच्या सभेत टाळ्या वाजत असल्या तरी जिवंतपणा असा जाणवत नव्हता. अशावेळी राज यांच्या मदतीला अजित पवार धावून आले. अजित पवारांवर राज यांनी टीकास्त्र सुरू करताच सभेत पुन्हा चैतन्य आले. सभा जिवंत झाल्याचे लक्षात येताच राज यांनीही टीका करताना अजित पवार ज्या मार्गाने गेले, त्याच मार्गाचा वापर केला. या सभेत राज यांनी उत्तर महाराष्ट्र विभागातील कोणत्याच समस्येला हात घातला नाही. केवळ चवीला म्हणून जळगावच्या केळींचा उल्लेख केला.