scorecardresearch

लॉयड्स मेटल्स कंपनीच्या उपाध्यक्षाला आमदाराच्या जावयाची बेदम मारहाण; ऋतुराज, जयराज हलगेकरसह पाच जणांवर गुन्हा

लोहदगडाच्या वाहतूक व कामावर कामगार ठेवणे तसेच आर्थिक देवाण़घेवाणीवरून महिनाभरापासून खाडिलकर व हलगेकर बंधूंमध्ये वाद सुरू आहे.

ऋतुराज, जयराज हलगेकरसह पाच जणांवर गुन्हा; सूरजागड लोह खाण प्रकरण

गडचिरोली : सूरजागड लोहखनिज प्रकल्पाचे काम सांभाळणारे लॉयड्स मेटल्स एन्ड एनर्जी लिमिटेड कंपनीचे उपाध्यक्ष अतुल खाडिलकर यांना त्यांच्या घरी २४ जानेवारीच्या रात्री अहेरीचे आमदार, माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे जावई ऋतुराज हलगेकर, त्यांचे बंधू जयराज हलगेकर यांच्यासह इतरांनी मारहाण केली. याबाबत खाडिलकर यांनी मंगळवारी अहेरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या घटनेमुळे सूरजागड प्रकल्पासह गडचिरोली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

अतुल खाडिलकर हे हलगेकर आणि त्यांच्या नातेवाईकासंदर्भात वाईट बोलल्याने ऋतुराज हलगेकर, त्यांचे बंधू जयराज हे संतापले होते. यातूनच त्यांनी साथीदारांसह खाडिलकर यांच्या आलापल्ली येथील अस्थायी निवासस्थानी पोहोचले. तिथेही खाडिलकर व हलगेकर यांच्यात वाद होऊन हलगेकर बंधूंनी खाडिलकर यांना बेदम मारहाण केली. याप्रकरणी अहेरी पोलिसांनी ऋतुराज हलगेकर, जयराज हलगेकर, जे.डी., भोजराज व इतरांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे, अशी माहिती तपास अधिकारी तथा अहेरीचे ठाणेदार श्याम गव्हाणे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सूरजागड येथील लोहदगडाच्या वाहतूक व कामावर कामगार ठेवणे तसेच आर्थिक देवाण़घेवाणीवरून महिनाभरापासून खाडिलकर व हलगेकर बंधूंमध्ये वाद सुरू आहे. हा वाद विकोपाला जाऊन आता एकमेकांना शिवीगाळ करणे, पाहून घेण्याची भाषा करणे, काम बंद करण्याची धमकी देणे असा टोकावर पोहोचला आहे. मात्र सदर उत्खनन व वाहतूक कामाचे सूत्रसंचालन असलेली त्रिवेणी अर्थमुवर्स ही कंपनी कुणालाही वेगळय़ा वाटेने जाऊ देत नव्हती. यामुळे अतिरिक्त मलाई लाटता येत नव्हती. यावर वेगळा मार्ग शोधून मलाई लाटण्याच्या प्रयत्नांना खाडिलकरांनी साथ न दिल्याने निर्माण झालेल्या वादातून ही मारहाण झाल्याची चर्चा परिसरात आहे.

दरम्यान, सूरजागड लोह खाण बंद करण्यावरून ग्रामसभा अधिक आक्रमक असून एटापल्ली व परिसरात खाणविरोधात सतत आंदोलने सुरू आहेत. आता कंपनीच्या उपाध्यक्षालाच आमदाराच्या नातेवाईकांकडून बेदम मारहाण झाल्याने येथील वातावरण तापले असून पुन्हा खाण बंदची मागणी होत आहे.  यासंदर्भात अधिक माहितीसाठी ठाणेदार श्याम गव्हाने यांच्याशी संपर्क साधला असता तपास सुरू आहे. चौकशीअंती आरोपींना अटक करू, अशी माहिती त्यांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Lloyds metals vice president beaten to death by mla surjagad iron mine case akp

ताज्या बातम्या