टाळेबंदीदरम्यान पालघर जिल्ह्यात अडकलेल्या मध्यप्रदेशातील नागरिकांसाठी जिल्हा व रेल्वे प्रशासनाच्या समन्वयाने पालघर येथून आज रात्री एक विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहे. महसूल, आरोग्य विभाग व स्थानिक पोलिस प्रशासन यांनी नियोजन केले असले तरी रेल्वे पोलिसांच्या आडमुठ्या धोरणामुळे या नागरिकांच्या तासभर अधिक काळ गर्दी करून बसावे लागले.

पालघर रेल्वे स्थानकातून सुटणारी ही पहिलीच रेल्वे गाडी आहे. त्यामुळे सर्व संबंधित विभागानी समन्वय साधून या गाडीने जाणाऱ्या मध्यप्रदेश राज्यातील झाबवा जिल्ह्यातील प्रवाशांना साडेतीन ते चार वाजेदरम्यान पालघर रेल्वे स्थानकात बोलवले होते. या सर्व बाराशे प्रवाशांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर या मंडळींना रेल्वे फलाटावर प्रवेश करण्याची मागणी रेल्वे पोलिसांनी सुरक्षिततेच्या कारणावरून नाकारली. यामुळे वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर देखील या सर्व मंडळीना रेल्वे स्थानकाच्या बाहेर असलेल्या आवारामध्ये गर्दी करून बसावे लागले. संबंधित गाडी रेल्वे फलाटावर लागत नाही तोपर्यंत या सर्व प्रवाशांना बाहेर ताटकळत राहावे लागल्याने महसूल विभाग व रेल्वे पोलिसांमध्ये देखील खटके उघडले. अखेर लोहमार्ग पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधल्यानंतर हे प्रकरण निवळले.

रेल्वे प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे या नागरिकांना एका ठिकाणी जमा राहावे लागले. दरम्यान, यावेळी फिजिकल डिस्टंसिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र पहावयास मिळाले. आगामी काही दिवसात पालघर रेल्वे स्थानकातून दुपारच्यावेळी दररोज एक गाडी सोडण्याचे नियोजन असल्याने पुढील काळात रेल्वे पोलिसांची योग्य समन्वय साधताना केल्यास नागरिकांना रणरणत्या उन्हामध्ये उभे राहण्याची पाळी ओढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.