पालघर जिल्ह्यातील विविध ठिकाणी टाळेबंदीत अडकलेल्या सुमारे १,२०० नागरिकाना घेऊन पालघरहून मध्यप्रदेश येथे जाणारी पहिली श्रमिक विशेष ट्रेन जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत रवाना झाली. ट्रेन रवाना होत असताना प्रवाशांनी दिलेल्या ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ या घोषणांनी पालघर रेल्वे स्थानक दुमदुमून गेले.

पालघर रेल्वे स्थानकातून आज ९.१५ वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे, पालघरचे उपविभागीय अधिकारी धनाजी तोरसकर, तहसीलदार सुनील शिंदे, यांच्यासह आरोग्य, पोलीस, रेल्वे प्रशासनाचे लोहमार्ग पोलीसअधीक्षक, अधिकारी-कर्मचारी यांनी प्रवाशाना शुभेच्छा देत ही ट्रेन रवाना करण्यात आली. या गाडीतून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांची संख्या लक्षणीय होती.

आरंभी काही काळ प्रवाश्यांचे नियोजन झाले नसले तरी कालांतराने रेल्वे प्रशासनमार्फ़त नंतर योग्य फिजिकल डिस्टंसिंगचे नियोजन करून सर्व प्रवाशांची आरोग्य तपासणी करून त्यांना प्रवासादरम्यान लागणारे जेवण, मास्क, पाण्याची बाटल्याही प्रशासनातर्फे देण्यात आल्या. पालघरमधील प्रशासनाच्या व निऑन फाउंडेशन तसेच जैन समाजाकडून चालविल्या जाणाऱ्या कम्युनिटी किचनमार्फत भोजनाची व्यवस्था करण्यात आली तसेच स्वयंसेवकांमार्फत नियोजनही करण्यात आले.