Ketan Agarwal Murder Case Police Investigation Latest Updates: लोणावळ्याजवळील लोहगड किल्ल्यावरून व्यावसायिक केतन अग्रवाल याला दरीमध्ये ढकलून हत्या केल्याच्या प्रकरणात आता एक मोठी अपडेट समोर येत आहे. केतनला दरीमध्ये नेमकं कुणी ढकललं, याबाबत अद्याप कोणताही ठोस पुरावा पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे या प्रकरणाचे गूढ अधिक वाढले असून, सत्य शोधण्यासाठी आता मुख्य आरोपी आणि केतनची होणारी पत्नी सिया गोयल हिची ‘लाय-डिटेक्टर’ (पॉलीग्राफ) चाचणी करण्याची परवानगी पुणे पोलिसांनी कोर्टाकडे मागितली आहे.

गुरुवारी पोलिसांनी यासंदर्भात पुणे न्यायालयात अर्ज सादर केला. तपासादरम्यान आरोपींनी दिलेल्या जबाबाव्यतिरिक्त, केतनला दरीमध्ये नक्की कुणी ढकललं याचा थेट साक्षीदार किंवा कोणताही ठोस तांत्रिक पुरावा पोलिसांना मिळालेला नाही. त्यामुळे या हाय-प्रोफाइल हत्याकांडाचा तपास पुढे नेण्यासाठी सियाची ‘पॉलीग्राफ’ चाचणी करणे अत्यंत गरजेचे असल्याचे पोलिसांनी कोर्टात सांगितले.

तपासातील अडथळे दूर करण्यासाठी पोलिसांचं पाऊल

पोलिसांनी कोर्टाला दिलेल्या अर्जात नमूद केलं आहे की, मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर व सह-आरोपी चेतन चौधरी यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. मात्र, त्यांच्या जबाबांमध्ये तफावत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या गुंतागुंतीच्या प्रकरणात नवीन धागेदोरे शोधण्यासाठी आणि तपासाला योग्य दिशा देण्यासाठी या चाचणीची मदत होणार आहे.

पॉलीग्राफ चाचणी म्हणजे काय?

जेव्हा एखाद्या गुन्ह्यात प्रत्यक्ष साक्षीदार किंवा भक्कम पुरावे नसतात, तेव्हा पोलीस तपासाचा भाग म्हणून संशयिताची ‘लाय-डिटेक्टर’ (खोटे बोलणे पकडणारी) चाचणी करतात. मात्र, कायद्यानुसार या चाचणीचा अहवाल कोर्टात थेट पुरावा म्हणून ग्राह्य धरला जात नाही. केवळ तपासाला गती देण्यासाठी आणि लपवलेले सत्य समोर आणण्यासाठी याचा वापर केला जातो.

संपूर्ण देशाला हादरवून सोडणारे ‘लोहगड हत्याकांड’

पुण्यातील प्रसिद्ध रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल आणि सिया गोयल यांचा साखरपुडा झाला होता, तर येत्या नोव्हेंबर महिन्यात त्यांचा विवाह होणार होता. मात्र, १८ जून रोजी लोहगड किल्ल्यावरून दरीत कोसळून केतनचा संशयास्पद मृत्यू झाला. सुरुवातीला हा अपघात वाटत असला, तरी पोलिसांनी केलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. सियाने तिचा मित्र चेतन चौधरी याच्यासोबत मिळून केतनच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.

या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रासह देशात खळबळ उडाली होती. घटनेनंतर पोलिसांनी सिया आणि चेतन या दोघांनाही अटक केली असून, सध्या ते ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत आहेत. आता कोर्ट सियाच्या ‘लाय-डिटेक्टर’ चाचणीला परवानगी देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे वृत्त ताजं असून, तपासातील पुढील अपडेट्स आम्ही या बातमीत जोडत राहू…