सुजय विखे-पाटलांच्या हातात ‘कमळ’, नगरमधून लोकसभेची उमेदवारी

अहमदनगर लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीकडे आहे.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे-पाटील यांनी अपेक्षेप्रमाणे आज (मंगळवार) भाजपात प्रवेश केला आहे. (छायाचित्र: एएनआय)

विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे-पाटील यांनी अपेक्षेप्रमाणे आज (मंगळवार) भाजपात प्रवेश केला आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार शिवाजी कर्डिले, माजी मंत्री बबनराव पाचपुते आदी उपस्थिती होते. यावेळी नगर जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती. ‘भाजपाचा विजय असो’ अशी घोषणा सुजय यांनी यावेळी दिली. तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुजय यांच्या नावाची नगर लोकसभा मतदारसंघासाठी शिफारस करणार असून त्याला केंद्रीय निवडणूक समितीकडून हिरवा कंदील मिळेल असा विश्वास व्यक्त केला. तत्पूर्वी रावसाहेब दानवे यांनीही नगरमध्ये नव्या नेतृत्वाला संधी देणार असल्याचे म्हटले.

नगर लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत राष्ट्रवादीकडे आहे. राष्ट्रवादीने हा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यास नकार दिल्यानंतर सुजय यांनी हा निर्णय घेतला. दुसरीकडे सुजय यांच्या भाजपा प्रवेशाला विद्यमान खासदार दिलीप गांधी यांच्या समर्थकांनी विरोध केला होता. दिलीप गांधी आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सुजय यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर राधाकृष्ण विखे-पाटील हे विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देतील असेही बोलले जात आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव माजी राज्यसभा सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांनीही गिरीश महाजन यांची भेट घेतली. परंतु, महाजन यांनी याविषयी बोलणे टाळले. रणजितसिंह मोहिते पाटील हेही भाजपाच्या गळाला लागले की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

तत्पूर्वी, सुजय यांनी भाजपामध्ये प्रवेश करु नये म्हणून काँग्रेसच्या पातळीवर सोमवारी दिवसभर प्रयत्न सुरू होते. अहमदनगरची जागा सोडावी म्हणून काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे शब्द ही टाकला होता. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती. राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी विखे-पाटील यांच्याशी चर्चा केली होती. अहमदनगरची जागा राष्ट्रवादीने विखे-पाटील यांच्या मुलासाठी सोडावी म्हणून दिल्लीच्या पातळीवर प्रयत्न सुरू झाले होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी संपर्क साधण्यात आला होता. ही जागा मिळावी म्हणून विनंती करण्यात आली. राहुल गांधी यांनीही पवारांशी दूरध्वनीवरून चर्चा केल्याचे समजते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Lok sabha election 2019 congress leader sujay vikhe patil enter into bjp

ताज्या बातम्या