बहुजन वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसबरोबरील संभाव्य आघाडी तोडल्याची घोषणा मंगळवारी केली. येत्या १५ तारखेला राज्यातील सर्व ४८ जागांवरील उमेदवारांच्या नावाची घोषणा करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. काँग्रेसबरोबरचे सर्व प्रस्ताव संपले, असे त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले. दरम्यान, सोमवारी त्यांनी सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघातून लढणार असल्याचे जाहीर केले होते. त्यांच्या उमेदवारीमुळे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासमोरील अडचणीत वाढ झाल्याचे बोलले जात आहे.

प्रकाश आंबेडकर हे अकोला येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, काँग्रेसबरोबर आता चर्चा होऊ शकत नाही. सर्व मार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे काँग्रेसबरोबर आता आघाडी शक्य नसून येत्या १५ तारखेला बहुजन वंचित आघाडीचे सर्वच्या सर्व ४८ जागांवरील उमेदवारांच्या नावाची घोषणा केली जाईल.

आमची भाजपा-शिवसेनेविरोधात लढाई सुरु असून राजू शेट्टींशी आमचा काही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तत्पूर्वी, सोमवारी त्यांनी भाजपा-शिवसेनेसह काँग्रेसवरही टीका केली होती. सध्या विविध मुद्द्यांच्या नव्हे, तर गुद्द्याच्या राजकारणाला प्रारंभ झाला असून, याबाबत आपण काँग्रेस-भाजपचा निषेध करतो, असे ते म्हणाले होते. या निवडणुकीत मुस्लिम, एससी, भटके विमुक्त या मतदारांची महत्त्वाची भूमिका राहणार आहे. सर्वसाधारण मतदार कोणाकडे झुकतो, हेही महत्त्वाचे राहणार आहे, असेही ते म्हणाले होते.