सुशीलकुमार शिंदे / प्रसाद हावळे

दुसऱ्या टप्प्यात निवडणूक पार पडलेल्या पश्चिम विदर्भात अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ-वाशिम हे चार मतदारसंघ येतात. या चार मतदारसंघांपैकी महाविकास आघाडीकडून शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेसने प्रत्येकी दोन जागा लढवल्या. तर महायुतीकडून शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपने प्रत्येकी दोन जागा लढवल्या. यात बुलढाणा आणि यवतमाळ-वाशिम या मतदारसंघांमध्ये दोन्ही शिवसेनांमध्ये थेट लढत झाली. तर अकोला आणि अमरावती या मतदारसंघांमध्ये भाजप व काँग्रेस यांच्यात लढत झाली.

yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
Narendra modi and uddhav thackeray
“मोदी यांची प्रकृती बरी नाही, पण लक्षात कोण घेतो?” ठाकरे गटाचा मोदींना टोला
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
chhagan bhujbal narendra modi
भाजपाच्या ‘४०० पार’च्या घोषणेचा निवडणुकीत फटका बसला? भुजबळांची जाहीर कबुली; मोदींचा उल्लेख करत म्हणाले…
review of lok sabha election in beed lok sabha constituency
बीड : जातीय जाणिवा चेतवणारा प्रचार
Raghuram Rajan reuters
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला तर…”, भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत माजी RBI गव्हर्नर रघुराम राजन यांचं मोठं वक्तव्य
by election for rajya sabha seats in maharashtra on june
राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी २५ जूनला पोटनिवडणूक; साताऱ्याला खासदारकी?

यातील बुलढाणा मतदारसंघात शिंदे गटाकडून विद्यामान खासदार प्रतापराव जाधव यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांच्याविरोधात ठाकरे गटाकडून नरेंद्र खेडेकर यांना रिंगणात उतरवण्यात आले. मात्र, अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांच्यामुळे या मतदारसंघात खऱ्या अर्थाने चुरस निर्माण झाल्याचे दिसले. मेहकर, बुलढाणा, चिखली आणि सिंदखेडराजा या भागात तुपकर यांचा दांडगा जनसंपर्क असल्याने शिंदे गटाचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्यापुढे आव्हान उभे राहिले. मात्र, खामगाव आणि जळगाव-जामोद मतदारसंघातील हिंदुत्ववादी मतदार जाधव यांच्या पाठीशी याही वेळी ठामपणे उभा राहताना दिसला. ठाकरे गटाचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांच्या प्रचारात उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर ऊर्जा भरल्याचे दिसून आले. येथे दलित आणि मुस्लीम मतदार त्यांच्याकडे वळलेला दिसतो. मात्र भाजपवर नाराज शेतकरी मतदार तुपकर आणि खेडेकर यांच्यात विभागला गेला. तर मराठा आणि कुणबी मतदारांचा कल तिन्ही उमेदवारांच्या पाठीशी दिसून आला. तसेच या मतदारसंघातील सहाही आमदार महायुतीचे असल्याने प्रतापराव जाधव यांचे राजकीय व्यवस्थापन इतर उमेदवारांच्या तुलनेत सरस राहिले.

दोन्ही शिवसेनांमध्ये यवतमाळ-वाशिम या मतदारसंघातही थेट लढत झाली. येथे शिंदे गटाकडून विद्यामान खासदार भावना गवळी यांना डावलून राजश्री पाटील यांना उमेदवारी दिल्याने बरीच चर्चा झाली होती. तर ठाकरे गटाकडून येथे आधीच संजय देशमुख यांना उमेदवारी जाहीर झाली होती. त्यामुळे प्रचारासाठी कमी वेळ मिळूनही भाजपचे मजबूत संघटन, तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना हाताशी घेऊन केलेले सूक्ष्म नियोजन यामुळे सुरुवातीला एकतर्फी वाटणाऱ्या निवडणुकीला तुल्यबळ लढतीचे स्वरूप देण्यात शिंदे गटाच्या राजश्री पाटील यांना यश आल्याचे दिसून आले. तसेच या मतदारसंघात निर्णायक असणाऱ्या बंजारा समाजाचा कल हा मंत्री संजय राठोड, पुसदचे आमदार इंद्रनील नाईक आणि भाजपचे विधान परिषद आमदार निलय नाईक यांच्यामुळे राजश्री पाटील यांच्या बाजूने राहिलेला दिसून येतो. एकीकडे कारंजा आणि वाशीम शहरात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ध्रुवीकरण होत असतानाच महायुतीच्या तिसऱ्या घटक पक्षाची मात्र आपला पारंपरिक मतदार राखताना दमछाक झाली. राळेगावमध्ये काँग्रेसचे माजी मंत्री वसंत पुरके यांच्यामुळे महाविकास आघाडीचे पारडे जड दिसून येत होते. मात्र, येथील सीता मंदिराच्या विकासाचे आश्वासन देत भाजपने स्थानिक मतदारांना महायुतीकडे वळवण्यात यश मिळवल्याचे दिसते. स्थानिक विरुद्ध बाहेरील उमेदवार आणि कुणबी विरुद्ध देशमुख अशी दिशा प्रचाराला देण्याचा प्रयत्न येथे झाला, पण त्यास पुरेसा प्रतिसाद मिळताना दिसला नाही. सुरुवातीच्या काळात ठाकरे गटाच्या संजय देशमुख यांनी प्रचारात आघाडी घेतली होती. परंतु प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात देशमुख यांच्यासोबतच राजश्री पाटील यांचाही प्रचार प्रभावी पद्धतीने झालेला दिसून आला. बंजारा, मराठा, कुणबी आणि मुस्लीम मतदारांचा वाढलेला टक्का या मतदारसंघात निर्णायक ठरेल असे चित्र आहे.

हेही वाचा >>> राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी २५ जूनला पोटनिवडणूक; साताऱ्याला खासदारकी?

पश्चिम विदर्भातील अमरावती आणि अकोला हे मतदारसंघ तिरंगी लढतींमुळे चर्चेत आले. यात अमरावती मतदारसंघात भाजपकडून नवनीत राणा यांना, तर काँग्रेसकडून बळवंत वानखडे यांना उमेदवारी देण्यात आली. येथे बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने दिनेश बुब यांना उमेदवारी देऊन चुरस निर्माण करण्याचा प्रयत्न केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेमुळे बच्चू कडू यांची सभा रद्द केल्याने निर्माण झालेला रोष पाहता, बुब यांना चांगला प्रतिसाद मिळेल असे चित्र होते. पण प्रत्यक्षात मतदारांमध्ये त्यांच्याविषयी उदासीनता दिसून आली. त्यामुळे येथील निवडणूक वरकरणी तिरंगी दिसत असली, तरीही मुख्य लढत राणा विरुद्ध वानखडे अशीच झालेली पाहायला मिळाली. त्यात मुस्लीम आणि दलित मतदारांचा वानखडे यांना पाठिंबा मिळताना दिसला. मेळघाटातील आदिवासी मतदारांमध्ये सुरुवातीच्या काळात राणा यांच्याविषयी असलेली नाराजी निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात दूर करण्यात राणा यांना यश मिळाल्याचे दिसून आले. शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे आनंदराव अडसूळ यांनी प्रचारातून माघार घेतल्याने राणा यांच्यापुढे आव्हान निर्माण झाले होते, तरी हिंदुत्ववादी मतदार आकर्षित करण्यात त्यांना यश आल्याचे दिसून येते. संत्रा उत्पादक आणि इतर शेतकऱ्यांची भाजपवर नाराजी दिसून येत असली, तरीही बडनेरा येथील रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखाना पूर्णत्वास जाणे, त्याचबरोबर अमरावतीत पीएम मित्रा टेक्सटाइल पार्कच्या उभारणीची करण्यात आलेली घोषणा यांचा फायदा नवनीत राणा यांना होऊ शकतो.

अकोला मतदारसंघात भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे, काँग्रेसचे अभय पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर अशी तिरंगी लढत झाली. येथे मराठा, कुणबी, दलित आणि मुस्लीम मतदार निर्णायक आहे. मराठा व कुणबी मतदारांचा कल भाजपचे धोत्रे आणि काँग्रेसचे पाटील यांच्यात विभागलेला दिसून आला. बौद्ध मतदारांव्यतिरिक्त अन्य समाजातील मतदार अल्प प्रमाणात प्रकाश आंबेडकर यांच्याकडे आकर्षित झालेला दिसून आला. अन्य ओबीसी मतदार पाटील यांच्या तुलनेत धोत्रे यांच्याकडे अधिक वळताना दिसून येत आहे. या मतदारसंघांत तीनही उमेदवार तुल्यबळ असल्याने आणि तिघांची प्रभाव क्षेत्रे वेगवेगळ्या समाजात व विधानसभा मतदारसंघांत असल्यामुळे येथील लढत कमालीची चुरशीची झाली. मतदारसंघातील मराठा व कुणबी मतदार स्वत:कडे वळविण्यात तिघांपैकी ज्या उमेदवाराला यश मिळेल, त्याने येथे बाजी मारलेली असेल. २०१९ च्या निवडणुकीत पश्चिम विदर्भातील या चार मतदारसंघांपैकी बुलढाणा, अकोला, यवतमाळ-वाशिम या तीन मतदारसंघांमध्ये महायुती विजयी झाली होती. तर तेव्हा अमरावतीमध्ये अपक्ष विजयी झालेल्या नवनीत राणा यावेळी भाजपच्या उमेदवार आहेत. पश्चिम विदर्भावर महायुतीचे हे वर्चस्व याहीवेळी कायम राहील का, की तिरंगी लढतींमुळे यावेळी वर्चस्वाचा नवा रंग पाहायला मिळेल, हे पाहायचे.