‘ब्लॉग बेंचर्स’ उपक्रमाला कोकणातील महाविद्यालयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
तरुणाईच्या विचार व लेखनक्षमतेला अनोखी संधी देणाऱ्या ‘ब्लॉग बेंचर्स’ या उपक्रमाचे कोकणातील महाविद्यालयांच्या प्राचार्यानी मन:पूर्वक स्वागत करत या उपक्रमाला सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले आहे.
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांतील महाविद्यालयांच्या प्राचार्याची संयुक्त बैठक मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत देवगड (जि. सिंधुदुर्ग) येथील एस. एच. केळकर महाविद्यालयात झाली. ‘लोकसत्ता’तर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘ब्लॉग बेंचर्स’ या उपक्रमाचे सादरीकरण या बैठकीत करण्यात आले. खास महाविद्यालयीन युवक-युवतींसाठी असलेल्या या उपक्रमाव्दारे ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या आठवडय़ातील विशिष्ट अग्रलेखावर दोन तज्ज्ञांची मते या बाबतच्या संकेतस्थळावर दिली जातील. त्यावर विद्यार्थ्यांनी सुमारे ५०० ते ७०० शब्दांत निबंधवजा टिपण लिहिणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांना आपले विचार या ब्लॉगच्या माध्यमातून मांडणे शक्य होणार आहे. तसेच दर आठवडय़ाला निवडण्यात येणाऱ्या दोन निबंधांना पुरस्कार आणि ‘लोकसत्ता’तर्फे प्रसिद्धीही देण्यात येणार आहे. यावेळी चाळीस महाविद्यालयांच्या प्राचार्यानी या उपक्रमाचे मन:पूर्वक स्वागत करत विद्यार्थ्यांचा त्यामध्ये सहभाग राहावा, यासाठी सहकार्याचे आश्वासन दिले.

विद्यार्थ्यांची अग्रलेखावर मते असतात. त्यांना भावना व्यक्त करण्याची संधी ‘ब्लॉग बेंचर्स’मुळे उपलब्ध झाली आहे. ही चळवळ पुढे नेण्यासाठी आमच्या महाविद्यालयातील वाङ्मय मंडळ, वक्तृत्व व वादविवाद मंडळ इत्यादी व्यासपीठांद्वारे विशेष प्रयत्न केले जातील. त्यासाठी संबंधित प्राध्यापकांवर जबाबदारी सोपवली जाईल.
– डॉ. किशोर सुखटणकर, प्राचार्य, गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी.

अतिशय स्तुत्य उपक्रम. तरुण मनांना त्यांचे विचार आणि भावना चितारण्यासाठी नवा कॅनव्हास या उपक्रमशील व्यासपीठाद्वारे उपलब्ध झाला आहे. हार्दिक शुभेच्छा.
– डॉ. भरत भोसले, प्राचार्य, एस. एच. केळकर महाविद्यालय, देवगड.

‘लोकसत्ता’चे अग्रलेख नेहमीच वाचनीय असतात. आजच्या तरुण पिढीनेही त्यांचे वाचन आणि मनन करणे आवश्यक आहे. ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये सहभागी होण्यासाठी आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना निश्चितपणे प्रोत्साहन व आवश्यक मार्गदर्शन केले जाईल.
– डॉ. नरेंद्र तेंडुलकर, प्राचार्य, आठल्ये-पित्रे-सप्रे कला व वाणिज्य महाविद्यालय, देवरुख.