मुंबई : केवळ दृश्यस्थितीवर विसंबून न राहता जिल्ह्यांच्या शास्त्रीय प्रगतीचे मोजमाप करणार्‍या ‘लोकसत्ता जिल्हा निर्देशांक’ अहवालाचे प्रकाशन २० मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमात केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे सचिव डॉ. सौरभ गर्ग यांचे ‘धोरण आखणी प्रक्रियेतील जिल्हा सांख्यिकीचे महत्त्व’ या विषयावर व्याख्यान होईल.

प्रगतीच्या एकाच पट्टीवर सर्वच जिल्ह्यांची तुलना न   करता विविध निकषांच्या आधारे त्यांचे वर्गीकरण करून आणि त्याअंतर्गत त्यांच्या प्रगतीचे मापन करून मांडल्या जाणार्‍या ‘लोकसत्ता जिल्हा निर्देशांक’ अहवालाचे यंदा चौथे वर्ष आहे. मुंबईत होणार्‍या एका सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अहवालाचे प्रकाशन होणार आहे. अहवालानुसार सर्वोत्तम आणि लक्षवेधक कामगिरी करणार्‍या निवडक जिल्ह्यांच्या  जिल्हाधिकार्‍यांचा या कार्यक्रमात सन्मान केला जाणार आहे. या कार्यक्रमात केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे सचिव डॉ. सौरभ गर्ग यांचे व्याख्यान होईल. ‘मेजरिंग व्हॉट मॅटर्स: स्ट्रेंग्थनिंग डिस्ट्रीक्ट लेव्हल डेटा फॉर मोर इन्फॉर्मड पॉलिसीमेकिंग’ (मापनाचे महत्त्व: डोळस धोरणआखणीसाठी जिल्हा सांख्यिकीचे बळकटीकरण) असा या व्याख्यानाचा विषय आहे.

भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी असलेल्या डॉ. गर्ग यांनी याआधी सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयात सचिव म्हणून कार्यरत असताना मागास समुदायांसाठीच्या धोरण आखणीत मोलाची भूमिका बजावली. तसेच केंद्रीय वित्त मंत्रालयात कार्यरत असताना थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) आणि थेट विदेशी गुंतवणुकीविषयी धोरण आखण्यात त्यांचा सहभाग राहिला. ‘आधार’ची यंत्रणा तंत्रसक्षम बनवणार्‍या पथकाचे नेतृत्वही डॉ. गर्ग यांनी केले. ओदिशा सरकारमध्ये कृषी, नगरविकास आणि उद्योग विभागांत सचिवपदावर डॉ. गर्ग बरीच वर्षे कार्यरत होते. जागतिक बँकेत सल्लागार म्हणूनही काही काळ त्यांनी काम पाहिले. आयआयटी दिल्लीतून बीटेक, आयआयएम अहमदाबादमधून एमबीए आणि जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीतून पीएचडी, अशी डॉ. गर्ग यांनी शैक्षणिक कारकीर्द राहिली आहे.

जिल्हा निर्देशांकाविषयी

 ‘लोकसत्ता’ने २०२३ पासून ‘जिल्हा निर्देशांक’ हा उपक्रम सुरू केला. यामधे महाराष्ट्र सरकारच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाकडून नोंदवण्यात येणार्‍या आकडेवारीचे शास्त्रीयदृष्ट्या विश्लेषण करून जिल्ह्यांच्या विकासाचा निर्देशांक ठरवण्यात येतो. सारस्वत बँक मुख्य प्रायोजक असलेल्या या उपक्रमाची सहप्रस्तुती संजय काकडे ग्रुप करत आहेत. गोखले इ्स्टिटट्यूट ऑफ पॉलिटिक्स ॲण्ड इकॉनॉमिक्स, पुणे हे नॉलेज पार्टनर असलेल्या या उपक्रमाचे हे चौथे वर्ष. राज्य सरकारचे सांख्यिकी खाते या उपक्रमाचे विदा-सहकारी (डेटा पार्टनर) असून राज्याचे अर्थशास्त्र-पारंगत माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे मुख्य मार्गदर्शकाची जबाबदारी पार पाडतात.