राज्यसभेपाठोपाठ विधान परिषद निवडणुकीतही भाजपाने महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे. पुरेशी मते नसतानाही भाजपाचे पाचही उमेदवार विजयी झाले. शिवसेना आणि काँग्रेसची मते फुटल्याने महाविकास आघाडीला चिंता सतावत असतानाच एकनाथ शिंदे संपर्काबाहेर गेल्याने मोठा राजकीय भूकंप आला आहे. राज्यसभा निवडणूक निकालानंतर लोकसत्ताच्या १३ जूनच्या अग्रलेखात विश्लेषण करताना राज्यातील राजकीय स्थितीचा आढावा घेण्यात आला होता. यावेळी राज्यात काय परिस्थिती उद्भवू शकते याचा सूचक इशाराही होता.

काय होतं अग्रलेखात?

राज्यसभा निवडणुकीत भाजपच्या ‘यशा’चे श्रेय निर्विवाद देवेंद्र फडणवीस यांना द्यावे लागेल तसेच सत्ताधारी आघाडीच्या केविलवाण्या पराभवाचे अपश्रेय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घ्यावे लागेल. अमर्याद साधनसंपत्ती, केंद्रीय यंत्रणांची अदृश्य पण वास्तव भीती आदी कितीही कारणे भाजपच्या यशामागे विरोधकांकडून दिली जात असली तरी त्या सर्वामागे फडणवीस आणि भाजपचे अथक राजकीय कौशल्य आहे हे मुळीच नाकारता येणारे नाही. मुळात ही निवडणूक व्हायला नको होती, गेल्या २४ वर्षांत अशी काही निवडणूक या राज्याने पाहिलेली नाही, तीमुळे घोडेबाजाराची संधी निर्माण झाली वगैरे सर्व चर्चा आता फजूल ठरते. हे सर्व होणार याचा अंदाज भाजपखेरीज अन्य पक्षांना होता तर मुदलात त्यांनी निवडणूक ओढवून घ्यायला नको होती. स्पर्धेत उतरायचे की नाही याचा निर्णय ती सुरू होण्याआधी करायचा असतो. एकदा का स्पर्धा सुरू झाली की ‘‘परिस्थिती मला अनुकूल नव्हती’’, ‘‘पंच नि:स्पृह नाहीत’’ वगैरे किरकिर करणे निरर्थक. सत्ताधारी महाविकास आघाडीने ती करू नये. आपल्याखालून गाढव निघून गेल्यावर ते का गेले वगैरेंचा ऊहापोह मनाला समाधान देणारा असला तरी त्यामुळे गेलेले गाढव काही परत येत नसते. म्हणून असे झाल्यावर पुढे काय, या प्रश्नास भिडणे अधिक महत्त्वाचे. याबाबतही हेच वास्तव अधिक गंभीर आहे. त्याच्या विश्लेषणात ‘फडणवीस यांना माणसे आपलीशी करण्यात यश मिळाले’ हे शरद पवार यांचे प्रतिक्रियात्मक विधान सर्वार्थाने सूचक.

संपूर्ण अग्रलेख वाचण्यासाठी क्लिक करा