राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष शरद पवार यांनी मागील वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये, “नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही. तो अपरिपक्व आहे,” असं म्हणत पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचं विधान खोडून काढलं होतं. मात्र यानंतर पवार यांच्या घरामध्ये कसं वातावरण होतं यासंदर्भातील खुलासा शरद पवार यांचे नातू आणि पार्थ यांचे चुलत बंधू रोहित पवार यांनी केला आहे. ष्ट्रवादी काँग्रेसच्या तरुण फळीतील नेतृत्व आणि पवार कुटुंबातील पुढील पिढीचे नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित यांनी ‘लोकसत्ता डॉट कॉम’ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये नातू आणि आजोबांमधील त्या वादासंदर्भात भाष्य केलं आहे.

नक्की वाचा >> पार्थ यांचा पराभव आणि मोदी कनेक्शन : रोहित पवार म्हणतात, “तो पराभव कुटुंबासाठी धक्का होता पण…”

शरद पवारांनी मध्यंतरी पार्थ पवारांना कानपिचक्या दिल्या होत्या. मी पार्थ पवारांच्या मताला काडीचीही किंमत देत नाही असं ते म्हणाले होते. त्यानंतर घरामध्ये काय वातावरण होतं?, असा प्रश्न रोहित पवार यांना मुलाखतीमध्ये विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना रोहित पवार यांनी नातू चुकला तर त्याला आजोबा नाही बोलणार तर कोण बोलणार असा प्रतिप्रश्न उपस्थित केला. त्या सगळ्या प्रकरणानंतर पवारांच्या घरातील वातावरण कसं होतं याबद्दल रोहित यांनी, “काही विशेष नाही सगळं नॉर्मल होतं सगळं,” असं म्हटलं आहे.

मात्र त्याच वेळी रोहित यांनी, “एक गोष्ट सांगू इच्छितो की उद्या मी पण एखादी चूक केली तर आजोबा नातवाला बोलणार नाही तर कोणाला बोलणार? नातवंड पण ती गोष्ट स्पोर्टींगली घेत असतात. फक्त ती चूक परत घडू नये याचा पण प्रयत्न आम्ही सर्वजण करत असतो,” असंही म्हटलं आहे.

नक्की वाचा >> शरद पवारांनी विचारलेला ‘तो’ प्रश्न आणि कर्जत-जामखेडमधून निवडणूक लढण्याचा निर्णय; रोहित पवारांचा खुलासा

काय घडलं होतं तेव्हा?

मागील वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी पार्थ पवार यांनी सीबीआय चौकशीची मागणी केलेली होती. यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी पार्थ पवार अपरिपक्व असल्याचं म्हटलं आहे. मुंबई तसंच महाराष्ट्र पोलिसांवर पूर्ण विश्वास असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं होतं. पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेत सुशांतच्या मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. शरद पवार यांना यासंबंधी विचारण्यात आलं असता त्यांनी, “नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही. तो अपरिपक्व आहे,” अशी प्रतिक्रिया दिली होती.

नक्की वाचा >> आजोबा म्हणून शरद पवार कसे वाटतात?; रोहित पवार म्हणतात, “अभ्यास केल्याशिवाय त्यांच्यासमोर…”

तसेच पार्थ यांच्यासंदर्भात बोलताना रोहित यांनी, “पार्थबद्दल बोलायचं झालं तर तो मनाने फार चांगला आहे. निर्णय घेताना कधीकधी तो अचानक निर्णय घेण्याचा प्रयत्न तो करतो. पण आम्ही जेव्हा एकत्र असतो तेव्हा एकमेकांसोबत विनोद करणं. भावंडं म्हणून एकमेकांची चेष्टा मस्करी करणं, हे सारं आम्ही करत असतो,” असं मत व्यक्त केलं आहे.