राज्यात उद्योजकांना आवश्यक ते सर्व सहकार्य करणार; उद्धव ठाकरेंनी दिलं वचन

अर्थचक्र चालवताना उद्योगधंदे सुरु राहिले पाहिजेत, पण दोन घास देणाऱ्या शेतकऱ्यालाही जपलं पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले

Loksatta industrial conclave state entrepreneurs cm Uddhav Thackeray

एक लाख कोटी डॉलरची क्षमता गाठण्याच्या दिशेने सुरू असलेल्या राज्याच्या औद्योगिक प्रगतीचा, त्या प्रगतीस पूरक ठरणाऱ्या पायाभूत सुविधांमध्ये होणाऱ्या सकारात्मक बदलांचा वेध घेण्यासाठी ‘लोकसत्ता’च्या वतीने ‘इंडस्ट्रियल कॉन्क्लेव्ह २०२१’ चं आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गुरुवारी याचे उदघाटन करण्यात आले. यावेळी मी नवीन काही देणार नसलो तरी या राज्यात उद्योजकांना शक्य ते सर्व केल्याशिवाय राहणार नाही असं वचन देतो असं मुख्यमंत्र्यांनी म्हटले.

“उद्योजकांनी सुविधा द्यायच्या आहेत, सवलती द्यायच्या आहेत. वीजेचा दर कमी करायचा आहे पण हे सर्व करताना समतोल साधत पुढे जायला पाहिजे. उद्योजक त्यांच्या अडचणी घेऊन येतात. त्यांच्या दृष्टीने ते बरोबर आहे. पण त्या सोडवण्यामध्ये राज्याचा समतोल जर ढासळला तर सरकार कसं चालेल? जिथे मला समतोल ढासळताना दिसेल तिथे मी सांगणार. अर्थचक्र चालवताना उद्योगधंदे सुरु राहिले पाहिजेत. पण दोन घास देणाऱ्या शेतकऱ्यालाही जपलं पाहिजे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

“कोविडनंतर रोजीरोटीचा फार मोठा प्रश्न होणार आहे. या अस्वस्थेला तोंड देऊ शकलो नाही तर फार मोठे संकट निर्माण होईल. कुशल मनुष्यबळ निर्माण करून देण्याची जबाबदारी आपण घेतली आहे. उद्योग मित्रासारखी संकल्पना आपण राबवत आहोत. हे उद्योग मित्र राज्यात गुंतवणूक कशी करायची याचे उत्तम मार्गदर्शन करतील अशी व्यवस्था आपण निर्माण केली आहे. वन विंडो सिस्टीम आपण निर्माण केली आहे.  राज्यात गुंतवणूकीसाठी आपलेपणाची भावना निर्माण करण्याचे काम शासन करत आहे,” असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले

“माध्यम, प्रशासन आणि उद्योजक मिळून आज आपण एकत्र आलो आहोत ही खूप महत्वाची गोष्ट. ही जनता आपली, त्यांना दिलासा देण्याचे काम आपलं आहे. इतर राज्यातील मुख्यमंत्री महाराष्ट्रात येऊन उद्योजकांना त्यांच्या राज्यात गुंतवणूकीचे आवाहन करतात ही वेळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर येऊ नये असं मला वाटते कारण माझ्या महाराष्ट्रातील उद्योजकच महाराष्ट्राचे ब्रॅण्ड व्हावेत. महाराष्ट्र भारताचा आधार आहेच. महाराष्ट्रात संस्कार आहेत, जिद्द आहे, मेहनत आहे, निश्चय आहे. हा जीवन मरणाचा विषय, त्या विषयाला तुम्ही हात घातलात त्याबद्दल तुमचे अभिनंदन करतो. मी तुम्हाला विश्वास देतो, वचन देतो की राज्यात उद्योजकांना जे सहकार्य आवश्यक आहे ते ती मी दिल्याशिवाय राहणार नाही. आपण हातात हात घालून पुढे जाऊ या आणि महाराष्ट्राचे नाव मोठे करूया,” असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान, या परिसंवादातून औद्योगिक क्षेत्रातील बदल व पायाभूत सुविधांच्या विकासासाठी कोणकोणत्या उपाययोजना करत आहे याचा आराखडा समोर आणण्याचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या परिसंवादाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, साहाय्यक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ सिडको कपॅसिटे इन्फ्रा प्रोजेक्ट्स लि.,कॉर्पोरेट पार्टनर कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Loksatta industrial conclave state entrepreneurs cm uddhav thackeray abn

Next Story
गैरव्यवहारात अडकलेल्या मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत -खडसे
ताज्या बातम्या