प्राथमिक फेरीत मिळालेल्या यशानंतर सांघिकपणाचे दर्शन घडवत संत एकनाथ रंगमंदिरात गुरुवारी सादर झालेल्या विभागीय अंतिम फेरीत पाच एकांकिकांमधून मराठवाडय़ातील महाविद्यालयीन तरुण नाटय़क्षेत्राकडे किती गांभीर्याने पाहतात, याची प्रत्यक्ष अनुभूती उपस्थितांना घडली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नृत्य व नाटय़ या दोन्ही विभागांनी सर्व क्षेत्रात देदीप्यमान कामगिरी बजावली. ‘मसणातलं सोनं’ स्पर्धेत अव्वल ठरलं. १० हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.
अण्णा भाऊ साठे यांच्या कथेचे संहितेत रूपांतर करीत रावबा गजमल या दिग्दर्शकाने प्रभावीपणे ‘मसणातलं सोनं’ ही एकांकिका परीक्षकांसमोर ठेवली. त्यालाच सवरेत्कृष्ट दिग्दर्शक, सवरेत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक मिळाले. याच नाटकाला सवरेत्कृष्ट संगीत व प्रकाशयोजनेचे पारितोषिक मिळाले. आपले नाटक अव्वल ठरावे, या साठी सर्वच संघ इर्षेने सहभागी झाले होते. मात्र, प्रतिस्पर्धी संघातील कलाकाराने एखादी चांगली गोष्ट केली असेल, तर त्याला उपस्थित स्पर्धकांकडून ‘वाहवाही’ मिळत होती.
नाटकातील काही प्रसंग अंगावर शहारे आणणारे होते, तर काही प्रसंगांनी हशाही पिकत होता. जसजसा दिवस चढत गेला, तसतसा स्पर्धेत रंगही भरला. दुपारी चारच्या सुमारास स्पर्धा संपल्यानंतर परीक्षकांना कोण उजवा, कोण डावा हे ठरविण्यासाठी बराच वेळ खर्च करावा लागला. कारण स्पर्धेतील चुरसही तेवढीच होती. विभागीय अंतिम फेरीत दुसरे पारितोषिक ‘जाहला अनुपम सोहळा’ या एकांकिकेला मिळाले. साडेसात हजार, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, तर देवगिरीच्या महाविद्यालयाच्या ‘तिच्यासाठी वाट्टेल ते’ या एकांकिकेला ५ हजार रुपयांचे तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. स्पर्धेच्या निमित्ताने काढलेली रांगोळीही लक्षवेधक होती.
तो ‘श्याम’ पाहायला मिळाला!
१९५२ मध्ये ‘श्यामची आई’ हा चित्रपट निघाला. १९५३ मध्ये राष्ट्रपती पारितोषिक मिळाले. त्या चित्रपटात ज्यांनी ‘श्याम’ची भूमिका केली होती, ते माधव वझे दिवसभर परीक्षकांच्या भूमिकेत होते. पारितोषिक वितरणाच्या वेळी वझे यांचा परिचय नव्या पिढीतल्या कलाकारांना करून देण्यात आला, तेव्हा सारेच हेलावले. काहीजणांनी प्रतिक्रिया व्यक्त केली, ’तो ‘श्याम’ पाहायला मिळाला. बरे वाटले.’