लोकसत्ता-लोकांकिकाच्या विभागीय अंतिम फेरीसाठी १६ पैकी पाच संघांची निवड परीक्षकांनी रविवारी जाहीर केली आणि विजेत्या संघांनी जल्लोष केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संगीत विभागाची ‘जाहला सोहळा अनुपम’, देवगिरी महाविद्यालयाची ‘तिच्यासाठी वाट्टेल ते’, सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालयाची ‘उद्घाटन’, अध्यापक महाविद्यालय-जालना येथील ‘मेजवानी’ व विद्यापीठाच्या नृत्य विभागाची ‘मसणातलं सोनं’ या एकांकिका विभागीय अंतिम फेरीसाठी निवडण्यात आल्या. अंतिम फेरी ११ डिसेंबर रोजी औरंगाबाद येथील संत एकनाथ रंगमंदिर येथे होणार आहे.
 दोन दिवस रंगलेल्या एकांकिका स्पर्धेत दुसऱ्या दिवशी नाटय़क्षेत्रातील दिवंगत दिग्गज कलावंत विनय आपटे यांना श्रद्धांजली वाहून प्रयोगांना सुरुवात झाली. दिवसभरात ९ एकांकिका सादर झाल्या. औरंगाबाद, जळगाव आणि जालना या तीन जिल्ह्य़ांतून आलेल्या कलाकारांनी सकाळी ९.३० पासून सादरीकरणाला सुरुवात केली. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून अमेय उज्ज्वल व प्रा. योगिता महाजन यांनी काम पाहिले. ‘आयरिस’ या माध्यम संस्थेचे अभय परळकरही उपस्थित होते. लोकसत्ताच्या एकांकिकेमुळे मराठवाडा व खान्देशातून दर्जेदार नाटय़संहिता सादरीकरणाला वेगळी उंची मिळाली असल्याची प्रतिक्रिया परीक्षकांनी व्यक्त केली. भविष्यात काही नामवंत लेखकांकडून नवीन संहिता लिहून घेतल्यास त्याच्या सादरीकरणाचा आनंद महाविद्यालयीन तरुणांना मिळू शकेल, अशी सूचनाही अमेय उज्ज्वल यांनी केली.