औरंगाबाद केंद्रातून ‘मसणातलं सोनं’ प्रथम

लोकसत्ता-लोकांकिकेच्या विभागीय अंतिम फेरीत गुरुवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नृत्य विभागाची ‘मसणातलं सोनं’ ही एकांकिका औरंगाबाद केंद्रातून प्रथम आली.

सॉफ्ट कॉर्नर व एलआयसीच्या सहकार्याने सुरू असणाऱ्या लोकसत्ता-लोकांकिकेच्या विभागीय अंतिम फेरीत गुरुवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नृत्य विभागाची ‘मसणातलं सोनं’ ही एकांकिका औरंगाबाद केंद्रातून प्रथम आली. विद्यापीठाच्या संगीत विभागाची ‘जाहला सोहळा अनुपम’ व ‘तिच्यासाठी वाट्टेल ते’ या देवगिरी महाविद्यालयाच्या एकांकिकांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवला. ज्येष्ठ नाटय़कर्मी माधव वझे, वसंत दातार व रोहित देशमुख यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
शहरातील संत एकनाथ रंगमंदिरात सकाळी साडेनऊ वाजता विभागीय अंतिम फेरीचे उद्घाटन झाले. विद्यापीठाच्या संगीत विभागाची ‘जाहला सोहळा अनुपम’ ही एकांकिका सादर झाली आणि स्पर्धेचा दर्जा किती उंचीवरचा आहे, हे उपस्थितांनी अनुभवले. ‘मृत्यू’ या विषयाभोवती रंगलेले नाटय़ वेगळ्या धाटणीने सादर केल्याने या एकांकिकेने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला.
यानंतर देवगिरी महाविद्यालयाने ‘तिच्यासाठी वाट्टेल ते’ ही एकांकिका सादर केली. गरिबी व बेरोजगारी हा विषय गंभीरपणे मांडत सादर केलेली ही एकांकिकाही चांगलीच दाद घेऊन गेली. अर्थात, प्रेक्षकांची उत्कंठा क्षणाक्षणाला वाढविणाऱ्या ‘मसणातलं सोनं’ या एकांकिकेचे प्रत्येकाच्या तोंडी कौतुक होते. माणूस व पशू यातले अंतर नक्की कसे कमी होते, हे सांगणारी ही एकांकिका सर्वानाच भावली. रावबा गजमल यांनी ही एकांकिका दिग्दíशत केली. त्यांना सवरेत्कृष्ट अभिनयाचेही पारितोषिक देण्यात आले. या बरोबरच ‘जाहला सोहळा अनुपम’मधील सिद्धेश्वर थोरात यांनाही सवरेत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक देण्यात आले.
पारितोषिक वितरणप्रसंगी माधव वझे यांनी, प्रकाशझोतात आल्यानंतर कलाकारांनी कसे वागावे, कसे बोलावे याचा सातत्याने सराव करावा लागतो. पारितोषिक न मिळताही त्यात सातत्य ठेवावे लागते. अनेकदा हे सोडून द्यावे, असे वाटते. मात्र, सातत्य ठेवणे गरजेचे आहे, असे मनोगत व्यक्त केले. पारितोषिक वितरणप्रसंगी एलआयसीचे शाखा व्यवस्थापक सुनील कुलकर्णी, एक्स्प्रेस समुहाचे वरिष्ठ उपाध्यक्ष (वितरण) सुनील नायर, मुख्य वितरण व्यवस्थापक मुकुंद कानिटकर, प्राथमिक फेरीचे परीक्षक अमेय उज्ज्वल, प्रा. योगिता महाजन आदींची उपस्थिती होती.
वैयक्तिक पारितोषिकांचे मानकरी
सवरेत्कृष्ट दिग्दर्शक व अभिनय – रावबा गजमल (मसणातलं सोनं), अभिनय – सिद्धेश्वर थोरात (जाहला सोहळा अनुपम), लेखन – अनिलकुमार साळवे (तिच्यासाठी वाट्टेल ते),  संगीत – भरत जाधव (मसणातलं सोनं), नेपथ्य – रवी बारवाल (जाहला सोहळा अनुपम), मंगेश तुसे व यशपाल गुमलाडू (तिच्यासाठी वाट्टेल ते), प्रकाशयोजना – मंगेश भिसे (मसणातलं सोनं).

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Loksatta lokankika drama competition masnatal sona first

ताज्या बातम्या