मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स’ संस्थेत राज्य शासनाच्या वतीने अध्यासन स्थापण्यात येणार आहे. त्यासाठी तीस लाख पौंड ( ३७ कोटी १३ लाख ८२,३०० रुपये) एकरकमी निधी देण्यास बुधवारी राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित सामाजिक न्याय, संविधानिक लोकशाही, आर्थिक समता आणि मानवी हक्कांच्या अभ्यासासाठी जागतिक दर्जाचे संशोधन केंद्र निर्माण करणे अध्यासन स्थापण्याचा उद्देश आहे. या अध्यासनामध्ये आंतरशाखीय संशोधनाला प्रोत्साहन राहील. राज्यघटना, सामाजिक न्याय आणि सार्वजनिक धोरण विषयांत प्रगत संशोधन करणे, परिसंवाद आणि शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करणे, लोकशाही आणि समावेशक विकास विषयक शैक्षणिक प्रकाशने आणि संशोधनाला चालना देणे, भारतीय आणि आंतरराष्ट्रीय संस्था संशोधकांमध्ये शैक्षणिक सहकार्य वाढवणे इत्यादी अध्यासनाची उद्दिष्ट्ये असतील.

अध्यासनासाठी या संस्थेतील विद्यमान प्राध्यापकांतून निवड केली जाईल. त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर खुल्या निवड प्रक्रियेव्दारे भरती केली जाईल. अध्यासनामध्ये तत्वज्ञान, समाजशास्त्र, आंतरराष्ट्रीय विकास, शासन प्रशासन, विधी आणि सामाजिक धोरण असे संभाव्य विभाग असतील. या अध्यासनाच्या माध्यमातून आंबेडकर यांच्या नावाने पीएच.डी.साठी शिष्यवृत्ती दिला जाईल. लंडन स्कूल आँफ इकॉनाॉमिक्स अँड पोलिटिकल सायन्स, महाराष्ट्र शासन आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था यांच्या समन्वयाने दहा पीएच.डी. शिष्यवृत्ती देण्यात येईल. पीएच.डी.चा कालावधी चार वर्षाचा असणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेली वायव्य लंडन मधील इमारत यापूर्वी महाराष्ट्र सरकारने २०१५ मध्ये ३ दशलक्ष पाउंडला खरेदी केली. २०१५ मध्ये पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यापासून डॉ. आंबेडकर यांना समर्पित असलेले हे एक विनामूल्य पर्यटन स्थळ झालेले आहे.

पीएच.डी. साठी शिष्यवृत्ती

शिष्यवृत्ती शैक्षणिक वर्ष २०२७-२८ पासून सुरु होईल. शिष्यवृत्तीसाठी प्राप्त अर्जांची छाननी लंडन स्कूल आँफ इकॉनॉमिक्सच्या समितीव्दारे केली जाईल. राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील इच्छुक उमेदवारांनी या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची इच्छा स्पष्ट नमूद करणे आवश्यक असेल. पहिल्या दहा शिष्यवृत्तीसाठी महाराष्ट्र शासन, बार्टी आणि लंडन स्कूल इकाॉनाॉमिक्स यांच्याकडून ५०: ५० प्रमाणात अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. सन २०२७-२८ वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी दोन कोटी ३६ लाख ८३ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.