अलिबाग – माणगाव तालुक्यातील लोणेरे येथे भरदिवसा एका लॉजमध्ये तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे. या घटनेनंतर घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून गोरेगाव पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे.

सोमवारी दुपारच्या सुमारास ही बाब उघडकीस आली. मुंबई गोवा महामार्गालगत लोणेरे इथं हा लॉज आहे. एक तरुण आणि एका तरुणीने लॉजमधील एक रूम भाड्याने घेतली. दुपारच्या सुमारास हा तरुण तिथून बेपत्ता झाला तर रक्ताच्या थारोळ्यात तरुणीचा नग्नावस्थेतील मृतदेह आढळून आला.

या तरुणीच्या मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू असून या हत्याकांडातील संशयित फरार असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी पाठवला आहे. दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवली आहेत. पोलिसांनी याबाबत लॉजच्या मालकाकडे चौकशी सुरू केली आहे.

या तरुणीला लॉजवर घेवून जाणाऱ्या तरुणाचा शोध सुरू असून तो रत्नागिरी येथील असल्याची माहिती समोर आली आहे. त्याला पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाल्याची माहिती मिळते आहे.

गेल्यावर्षी कर्जत मध्ये काय झाले होते?

गेल्यावर्षी कर्जत तालुक्यातील ठाकूरवाडी गावाच्या हद्दीत रेल्वे मार्गालगत एका सुटकेस मध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला होता. महिलेची हत्याकरून तीचा मृतदेहाचा मृतदेह सुटकेस मध्ये ठेवण्यात आला होता. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

२८ ते ३२ वर्षीय या महिलेची हत्याकरून चेहरा आणि डोक्याला प्लास्टिकच्या पिशवीने बांधण्यात आले होते. हातपाय नायलॉनच्या दोरीने बांधून मृतदेह गुलाबी रंगाच्या एका टॉली असलेल्या सुटकेस मध्ये ठेवण्यात आला होता. पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने तीचा मृतदेह रेल्वे मार्गालगत टाकून देण्यात आला होता.

पेण येथे काय घडले होते?

सन २०२५ मधेच दुसर्‍या एका घटनेत पेण तालुक्यातील दुरशेत फाटा येथे नदी किनारी एका सुटकेस मध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याची उकल होऊ शकली नव्हती. पेण तालुक्यातील दुरशेत फाटा येथे उग्र वास येत होता. स्थानिकांच्या हीबाब लक्षात आली. त्यामुळे त्यांनी आसपासच्या परिसरात कुठले जनावर मरून पडले आहे का याचा शोध सुरू केला.

तेव्हा बाळगंगा नदी किनारी एक भलीमोठी काळी सुटकेस आढळून आली. याच सुटकेसमधून उग्रवास येत होता. दुरशेत गावचे सरपंच दशरत गावंड यांनी तात्काळ गावच्या पोलीस पाटलांना बोलावून घेतले. त्यानंतर पेण पोलीसांना या घटनेची माहिती दिली होती. पोलीसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सुटकेस उघडून पाहिली असता, त्यात साधारणपणे तीस ते चाळीस वयोगटातील महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सुटकेस मध्ये आढळून आला होता. त्यामुळे पेण परिसरात खळबळ उडाली होती.

वारंवार होणाऱ्या या घटकांमुळे रायगड जिल्ह्यात महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा प्रकर्षाने समोर आला आहे. या गुन्ह्याची उकल करून आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली जात आहे.