कुडाळ शहराच्या बस स्थानकाच्या बाहेरून जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या १८ गाडय़ा शहर बसस्थानकातून येत्या आठ दिवसांत नेण्यात येतील, तसेच कुडाळ-शिर्डी बससेवा प्रायोगिक तत्त्वावर येत्या ५ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येईल, असे आश्वासन एस. टी.चे विभाग नियंत्रक चेतन सबनीस यांनी दिले.

सोशल मीडियाचा सुसाट ग्रुपच्या वतीने एस. टी. आगाराच्या प्रश्नावर कुडाळ शहरातील विविध राजकीय पदाधिकाऱ्यांनी ग्रुपवर आपली विकासाची तळमळ दाखविली तेव्हा ग्रुपचे पत्रकार रवी गावडे व नीलेश तेंडोलकर यांनी पुढाकार घेऊन एस. टी., पोलीस व महसूलच्या अधिकाऱ्यांची कुडाळ नवीन बसस्थानक गणेश मंदिरात बैठक बोलावली.

या वेळी एस. टी.चे विभाग नियंत्रक चेतन सबनीस यांनी एस. टी.चे जनतेला कायमच सहकार्य असल्याचे सांगितले. कुडाळ शहर बसस्थानकाची इमारत जीर्ण झाली असून, स्लॅब कोसळण्याची भीती उपस्थितांनी केली. त्या वेळी सबनीस म्हणाले, आपण या संदर्भातील वस्तुस्थितिदर्शक प्रस्ताव वरिष्ठांना पाठविला आहे, तसेच प्रवाशांची काळजी घेण्यात येत असल्याचे सांगितले.
कुडाळ कवीलकटा येथील साईबाबांचे मंदिर जुने आहे. साईंची समाधी घेण्यापूर्वीचे हे मंदिर आहे. त्यामुळे कुडाळ ते शिर्डी अशी बससेवा सुरू करून दोन्ही मंदिरे भक्तांनी जोडली जावी, अशी मागणी उपस्थितांनी केली असता गेल्या ५ नोव्हेंबरपासून प्रायोजिक तत्त्वावर बस सोडण्याचे सबनीस यांनी मान्य केले.

कुडाळ शहराच्या बसस्थानकाच्या बाहेरून परस्पर नवीन बसस्थानकावरून जाणाऱ्या अठरा बसेसना शहर बसस्थानकातून जाण्यासाठी निर्देश देण्यात येतील, असे चेतन सबनीस म्हणाले.या वेळी कुडाळ पोलीस निरीक्षक शहा यांनी वाहतूक सुलभ व्हावी म्हणून शहरवासीयांनी सहकार्य करावे, तसेच रिक्षाचालकही शिस्त पाळतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा परिषद माजी अध्यक्ष काका कुडाळकर, विकास कुडाळकर, दयानंद चौधरी, दीपलक्ष्मी पडते, संजय भोगटे, रुपेश पावसकर, सुनील भोगटे, पत्रकार राजन चव्हाण, अभय शिरसाट, मंदार शिरसाट, प्रसाद शिरसाट, राकेश कांदे, नीलेश तेंडोलकर यांनी चर्चेत सहभाग घेतला. पत्रकार रवी गावडे यांच्या पुढाकाराबद्दल पोलीस निरीक्षक शहा यांनी गुलाबपुष्प देऊन कौतुक केले.