महाराष्ट्रातल्या नंदुरबार जिल्ह्यात वडवी पाडा नावाचं गाव आहे. या गावातल्या महिला रोज पाण्याच्या शोधात दुपारच्या रणरणत्या उन्हात निघतात, एका डोंगराळ भागातून रिकामे हंडे, बादल्या घेऊन उतरतात. पाणी भरुन झालं की पुन्हा हीच डोंगराळ वाट भरलेले हंडे, बादल्या, भांडी डोक्यावर घेऊन वाहतात. या महिलांचं पाणी आणण्याचं सर्वात जवळचं ठिकाण हे तीन किलोमीटर अंतरावर आहे. त्यापुढेही त्यांना जावं लागतं. कडक उन्हात पायपीट केल्यानंतर त्यांना डोक्यावरून वाहून हे पाणी आणावं लागतं.
डोंगराळ भागात पाणी आणण्यासाठी आदिवासी महिलांची पायपीट
ज्या डोंगराळ भागात या आदिवासी महिला राहतात तिथे एक छोटा खड्डा आहे. त्यात पाणी येतं. पण जेमतेम चार पाच भांडी भरली की ते पाणी संपतं. त्यानंतर पुन्हा पाणी येण्यासाठी एक तास तरी वाट बघावी लागते. सातपुडा पर्वत रांगांमध्ये राहणाऱ्या या आदिवासी महिलांचं अर्ध आयुष्य दूरवर असलेल्या विहीरी, तलाव किंवा नदी इथून पाणी भरण्यात आणि डोंगराळ वाट तुडवत घरी येण्यात संपलं आहे.
पाणी भरण्याच्या रोजच्या नाईलाजामुळे विविध आजारांनी महिलांना ग्रासलं
अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यात २० हून अधिक गावांमध्ये राहणाऱ्या महिलांशी इंडियन एक्स्प्रेसने चर्चा केली. त्यांना पोटदुखी, व्हजायनल इनफेक्शन, किडणी स्टोन, कंबरदुखी अशा आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागतो आहे. काही महिलांचा पाणी अतिप्रमाणात वाहून आणल्याने गर्भपात झाला आहे. लहान असल्यापासून सतत डोक्यावर पाणी आणून वाहिल्याने या सगळ्या समस्या उद्भवतात. लग्न झालेल्या महिलांनाही पाण्यासाठीची वणवण चुकलेली नाही. त्यामुळे त्यांना गर्भपातासारख्या समस्यांनाही सामोरं जावं लागलं आहे.
बाजुबाई वडवी यांनी काय सांगितलं?
बाजुबाई धोमा वडवी यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं की मी चाळीस वर्षांची आहे. कळायला लागल्यापासून मागच्या सगळ्या वर्षांमध्ये मी रोज पाणी वाहिलं आहे. लहान होते डोक्यावरच्या भांड्यांचा आकार कमी होता. नंतर तो आकार वाढत गेला. मी जेव्हा १२ वर्षांची झाले तेव्हा माझी आई जेवढं पाणी आणायची तेवढंच मी पण डोक्यावर घेऊन यायचे. बाजुबाई म्हणाल्या मला तरुणपणापासून पोटदुखी, कंबरदुखीने ग्रासलं आहे. माझी सून ममता वडवी मला तेल मालीश करुन देते पण तेवढ्यापुरतंच बरं वाटतं. बाजुबाई म्हणाल्या माझी सून ममता २७ वर्षांची आहे. तिलाही पोटदुखीचा त्रास होतो, वजायनल इनफेक्शन होतं, कंबरदुखीचा त्रास आहे. मी आता चाळिशीत आले आहे पण मी आता पाणी भरुन एवढ्या लांबून चालू शकत नाही. मी जास्त वेळ उभीही राहू शकत नाही. त्यामुळे बसलेली असते. बाजुबाई म्हणाल्या मी १३ वर्षांची होते तेव्हा माझं लग्न झालं. त्यानंतर मी काही दिवसांमध्येच गरोदर राहिले. नववा महिना सुरु होता. त्यावेळी पाणी भरताना माझा गर्भपात झाला. काही पर्याय नाही. बायकांनी पाणी भरलं नाही तर घरांमध्ये पाणीच मिळणार नाही.
२३ गावांमधली पाण्याची स्थिती भीषण आहे
इंडियन एक्स्प्रेसने अक्कलकुवा आणि धाडगाव तालुक्यांमधील २३ गावांचा दौरा केला. या सगळ्या गावांमध्ये मिळून २८ हजार लोक राहतात. या गावांमधल्या महिलांनी सांगितलं की त्यांना प्यायचं पाणी भरुन आणण्यासाठी रोज तीन ते चार तास लागतात. तसंच काही वस्त्यांमध्ये अशी स्थिती आहे की पाणी आणण्यासाठी कितीही चकरा कराव्या लागतात. पहाटे तीन पासून महिला पाणी भरायला सुरुवात करतात. कंदिल आणि टॉर्चच्या उजेडात पाणी भरण्यास सुरुवात केली जाते. अशा ठिकाणी या महिला जातात जिथे पाणी नैसर्गिक खड्ड्यांमध्ये जमा होतं. ते लवकर लवकर संपतं. मग पुन्हा ते भरेपर्यंत वाट बघावी लागते. पाणी भरलं की डोंगराळ भागातून चढाई करत गाव गाठावं लागतं. हे रोजचं चित्र आहे, त्यामुळे महिलांना विविध आजारांनी ग्रासलं आहे.
अनेक गावांमध्ये आरोग्य सुविधांची वानवा
महिलांनी असंही सांगितलं की त्यांचे पिरियड्स सुरु होते तेव्हाही त्यांना पाणी भरावं लागतं. शिवाय त्याआधी तलावातल्या पाण्यात अंघोळ करावी लागते. यामुळे आम्हाला त्वचा रोगांनीही ग्रासलं आहे. तसंच लघवीच्या आजारांचाही त्रास सहन करावा लागतो. स्वच्छतेशी संबंधित आजारही होतात. अनेक गावांमध्ये प्राथमिक आरोग्य सुविधाही नाहीत. आमच्या गावांमध्ये पुजारी म्हणवल्या जाणाऱ्या पारंपरिक डॉक्टरांवर आम्ही जास्त अवलंबून आहोत. बोहुतीपाडा या ठिकाणी एका झाडाखाली वाळलेली मूळं, जडी बुटी, जंगलातलं तण एका पिवळ्या काडावर मांडलं जातं तिथेच काही काही उपाय केले जातात. डॉक्टर नटवर नाइक म्हणाले इथे महिला पोटदुखी, श्वेतपदर, इनफेक्शन अशा समस्या घेऊन येतात आणि मी त्यावर उपाय करतो.
डॉक्टर नटवर नाईक काय म्हणाले?
दर महिन्याला मासिक पाळीच्या समस्या, शअवेत पदराची समस्या, पोटदुखी, कंबरदुखी अशी दुखणी घेऊन ५० ते १०० महिला माझ्याकडे येतात. मी त्यांना जंगली केळ्यांपासून तयार केलेलं आणि जंगली वनस्पतींपासून तयार केलेलं औषध देतो. आमच्या अनेक पिढ्या हेच औषध देत आल्या आहेत त्यामुळे मी देखील हेच औषध देतो. जिल्हा रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत २५ ते ४५ या वयोगटातील महिलांमध्ये यूटेराइन प्रोलेप्सची २० नवी प्रकरणं समोर आल. आत्तापर्यंत म्हणजेच मागील सहा वर्षात अशी समस्या उद्भवलेल्या १६० महिलांवर उपचार झाले आहेत. ही संख्या आजार घेऊन समोर आलेल्या महिलांची आहे. अनेक महिला रुग्णालयांमध्ये येत नाहीत त्यामुळे ही संख्या याहून जास्त असू शकते.
